मुंबई: राज्यात गणेशोत्सवानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली असताना शिवसेना शिंदे पक्षाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. ही राजकीय भेट नव्हती, असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले.

कामानिमित्ताने दादर परिसरात आलो होता. तेव्हा राज ठाकरे यांच्याकडे चहा घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी घरी बोलविल्यानंतर खिचडी आणि चहा घेतला पण कोणतीही राजकीय खिचडी शिजली नाही, असे सष्टीकरण सामंत यांनी दिले आहे. त्याचवेळी ठाकरे यांच्याकडून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय बंगल्यावर जाणार आहे असे सांगण्यास सामंत विसरले नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठाकरे शिंदे यांच्यात नवनिर्माण होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई महापालिकांसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीचा डाव महायुतीने भरघोस मताने जिंकला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. त्यासाठी दोन पक्ष, नेते, एकीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ शकतो असे संकेत राज ठाकरे यांनी दोन ‘ठाकरे’ एकत्र येण्याच्या प्रश्नावर दिले.

उध्दव ठाकरे यांनीही या चर्चेवर काही अटी शर्तींवर एकत्र येण्याची तयारी दर्शवली. दोन्ही भाऊ परदेश दौऱ्यावरून एकत्र आल्यानंतर एकीकरणावर बैठका घेतील, अशी चर्चा असताना दोन्ही भावांना या एकीकरणावर बोलणे टाळले आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास शिंदे सेनेला मंबई पालिका निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवणाऱ्या शिंदे सेनेला मुंबई पालिकेतही घवघवीत यश मिळवण्याची इच्छा आहे. त्यासाठी ठाकरे पक्षातील अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारी साम, दाम, दंड, भेद नितीने आपल्याकडे वळविले जात आहेत. या सर्व नीतीचा एक भाग म्हणून राज ठाकरे यांनी शिंदे यांना टाळी दिल्यास मुंबई पालिकेत शिंदे सेनेचा मार्ग सोपा होणार आहे. शिंदे सेनेचे संकटमोचक उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.