मुंबई : भाजी खरेदीदरम्यान ६३ वर्षीय आजोबांचा मोबाइल गहाळ झाला. गहाळ झालेल्या मोबाइलमधील सिमकार्डच्या आधारे दोन बँक खाती रिकामी करून पावणेसात लाख रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार शिवडीत घडला. याप्रकरणी रफी अहमद किडवाई ( आरएके) मार्ग पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून बँक खात्यातील व्यवहारांच्या आधारे आरएके मार्ग पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

६३ वर्षीय तक्रारदार शिवडी क्रॉस रोड परिसरात वास्तव्यास आहेत. ते एका खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले. तक्रारीनुसार, ते १ मे रोजी सकाळी दुचाकीवरून भाजी खरेदीसाठी जात होते. त्यादरम्यान त्यांच्या खिशातील मोबाइल गहाळ झाला. त्यांनी मोबाइलचा सगळीकडे शोध घेतला. मात्र मोबाइल सापडला नाही.

घरी गेल्यानंतर मोबाइल हरविल्याचे त्यांनी कुटुंबियांना सांगितले. त्याच दरम्यान एका नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे ते अंत्यविधीसाठी रायगड जिल्ह्यातील अलिबागला येथे रवाना झाले. पैशांची गरज असल्याने त्यांनी ७ मे रोजी बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा खात्यात अवघे २७६ रुपये शिल्लक असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला.

बँक अधिकाऱ्याने खाते तपासताच १ ते ३ मेदरम्यान यूपीआयद्वारे खात्यावर व्यवहार झाल्याचे उघडकीस आले. बँक नोंदीनुसार या तीन दिवसांमध्ये १ लाख ४८ हजार ९९९ रुपये काढल्याचे निदर्शनास आले. मोबाइल फोन हरविल्यानंतर त्यामधील सिमकार्डचा वापर करून हे व्यवहार करण्यात आल्याची खात्री पटली. शिवडीतील बँक खात्यालाही हाच मोबाइल क्रमांक संलग्न असल्याने त्यांनी तेथील खाते तपासले. तेव्हा, २ ते ७ मेदरम्यान टप्प्याटप्प्याने ४ लाख ९३ हजार ५०८ रुपये यूपीआयमार्फत काढण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर पुढील व्यवहार थांबवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन बँक खात्यांतून एकूण ६ लाख ४२ हजार ८४६ रुपयांचे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या आठवड्यात त्यांनी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार, पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारदाराच्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी बँकेकडे मागितली आहे. या रकमेबाबतची काही माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. बहुसंख्य व्यवहार यूपीआयद्वारे करण्यात आले आहे. त्यासाठी आरोपीने मोबाइलचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. यातील काही व्यवहार राज्याबाहेरही करण्यात आले आहेत. तसेच एकाच बँक खात्यावर अनेक वेळा रक्कम पाठवण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहेत.