मुंबईः जुनी नाणी सव्वा कोटी रुपयांना खरेदी करण्याचे आमीष दाखवून ६५ वर्षीय महिलेची १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मध्य प्रादेशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिलेने रक्कम जमा केलेल्या बँक खात्याच्या साह्याने याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
तक्रारदार महिला माहिम येथील रहिवासी आहे. त्यांनी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात जुनी नाणी चांगल्या दरात खरेदी करण्याबाबतची जाहिरात समाज माध्यमांवर पाहिली होती. तक्रारदार महिलेकडे जुनी नाणी असल्यामुळे त्यांनी त्या जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्या व्यक्तीने स्वतःचे नाव नितीन कुमार असल्याेच सांगितले. तसेच तो ओल्ड कॉईन कंपनीतून बोलत असल्याचे महिलेला सांगितले. त्यावेळी महिलेने त्याला आधारकार्ड दाखवण्यास सांगितले. आरोपीनेही विश्वास संपादन करण्यासाठी महिलेला नितीन कुमार नावाचे बनावट आधारकार्ड पाठवले. जुनी नाणी विकण्यासाठी नोंदणी करावी लागते असे सांगून त्याने त्यासाठी एक संकेतस्थळ पाठवले. त्यावर ५२० रुपये जमा करून नोंदणी करण्यास सांगितले. नोंदणी झाल्यानंतर महिलेने आरोपीला व्हॉट्सॲपवरून जुन्या नोटा व नाण्यांचे छायाचित्र पाठवले. त्याने त्या नाण्यांचे व नोटांचे मूल्यांकन करून त्या बदल्यात सव्वा कोटी रुपये मिळतील, असे सांगितले. विश्वास संपादन करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे प्रमाणपत्रही दाखवले. पण या नाण्यांचे मूल्य अधिक असल्यामुळे महिलेला जीएसटी व इतर शुल्क भरावे लागेल, असे आरोपीने सांगितले. त्यानुसार तक्रारदार महिलेने विविध बँक खात्यांवर शुल्क जमा केले. त्यानंतर महिलेला दिल्ली सायबर पोलिसांकडून दूरध्वनी आला. विक्रम सिंह नाव सांगणाऱ्या या अधिकाऱ्याने तुमच्या नावावर सव्वा कोटी रुपये जमा होणार आहेत. त्यासाठी जीएसटी व इतर शुल्क भरले नसल्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महिला घाबरली. त्यांनी २० विविध व्यवहारांद्वारे १४ लाख २५ हजार एवढी रक्कम विविध बँक खात्यात जमा केली. त्यानंतर त्यांना राकेश अस्थाना नावाच्या अधिकाऱ्याचा दूरध्वनी आला. त्याने महिलेला पाच लाख ८० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले.
तक्रारदार महिलेने त्यांच्या परिचीत व्यक्तीची भेट घेतली व घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी त्यांनी तुमची सायबर फसवणूक झाल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने तात्काळ १९३० या मदत वाहिनीशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. महिलेच्या तक्रारीवरून नुकतीच मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.