मुंबई : गिरगावमधील गायवाडीजवळ रस्ता ओलांडणाऱ्या ८४ वर्षीय वृद्ध महिलेला बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बसची बुधवारी सायंकाळी धडक लागली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला.बेस्ट बस मार्ग क्रमांक ६६ ची बस बॅलार्ड पिअर येथून शीव बस स्थानकाच्या दिशेने जात होती. बस गिरगावमधील गायवाडीजवळून जात असताना वृद्ध महिला अरुणा जाडये (८४) रस्ता ओलांडत होत्या.

भरधाव वेगात आलेल्या बसने अरुणा यांना धडक दिली. या अपघातात अरुणा बसच्या खाली अडकल्या. आसपासचे पादचारी आणि टॅक्सीचालकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. टॅक्सी चालकाने जॅकच्या मदतीने बस वर केली आणि अरुणा यांना बसखालून बाहेर काढले. या अपघातात अरुणा यांच्या छातीला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. तात्काळ त्यांना उपचारासाठी ताडदेव येथील भाटिया रुग्णालयात नेण्यात आले. अरुणा यांचा बुधवारी रात्री ९.३८ च्या सुमारास मृत्यू झाला.