मुंबई : मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील एका विद्यार्थीनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व वसतिगृहांचा आढावा घेण्यात आला आहे. सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याबरोबरच मुलींच्या वसतिगृहांमधील सर्व रिक्त पदे भरली जातील, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील एका विद्यार्थीनीची तिथे बेकायदा राहणाऱ्या व सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या आरोपीने हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केली.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात घडलेल्या या घटनेमुळे वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संदर्भात मंगळवारी विलास पोतनीस, सुनील शिंदे, अमोल मिटकरी, विक्रम काळे, सतीश चव्हाण, सत्यजित तांबे या सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना पाटील यांनी वसतिगृहांच्या सुरक्षेबाबत सदस्यांना आश्वस्त केले. ‘‘या घटनेनंतर उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली मुलींच्या वसतिगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी व सुरक्षेसंबंधी उपाययोजन सुचविण्यासाठी समिती स्थापन केली होती. समितीने राज्यातील सर्व मुलींच्या वसतिगृहांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेतला, त्रुटी जाणून घेतल्या व एक सर्वंकष अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यांनी सुरक्षेबाबत सूचविलेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, तसा शासन आदेशही काढण्यात आला आहे’’, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
‘समितीच्या सूचनांनुसार उपाययोजना’
मुलींच्या वसतिगृहातील त्रुटींबाबत समितीने सर्वंकष अहवाल शासनाला सादर केला आहे. समितीने सुरक्षेबाबत सुचविलेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.