मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अजमेर – वांद्रे टर्मिनस विशेष रेल्वे गाडीच्या इंजिनमध्ये रविवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. लोकलचा खोळंबा झाल्याने अनेक प्रवाशांना फटका बसला. प्रवाशांना लोकलमधून उतरून रेल्वे रुळांवरून पायपीट करून जवळचे स्थानक गाठावे लागले.

गाडी क्रमांक ०९६५३ अजमेर – वांद्रे टर्मिनस विशेष रेल्वेगाडी रविवारी सकाळी ११ वाजता पालघरवरून वांद्रे टर्मिनसच्या दिशेने येत होती. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने सकाळी ११.५१ च्या सुमारास भाईंदर स्थानकावरील फलाट क्रमांक ६ वर ही रेल्वेगाडी थांबली. घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.

पश्चिम रेल्वेच्या तांत्रिक पथकाचे दुरूस्तीचे काम हाती घेतले. इंजिन दुरूस्त करण्यास सुमारे एक तास लागला. त्यानंतर रेल्वेगाडी पुढे मार्गस्थ झाली. ही रेल्वेगाडी बोरिवली रेल्वे स्थानकात नियोजित वेळेच्या सुमारे दोन तास विलंबाने पोहचली. तसेच वांद्रे टर्मिनस येथे रेल्वेगाडी उशिरा पोहचल्याने प्रवासी हैराण झाले. दरम्यान, इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे, अप जलद लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात आली. त्यामुळे एक अप जलद लोकल भाईंदर स्थानकाच्या सिग्नलजवळ थांबली आणि सुमारे ३० मिनिटे तिथेच उभी होती. या दीर्घ विलंबामुळे लोकलमधील प्रवाशांना रुळावरून चालत जवळचे स्थानक गाठावे लागले. रविवार सुट्टीचा दिवस असला तरी या लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी होती. या तांत्रिक बिघाडाचा प्रवाशांना फटका सहन करावा लागला.