‘एनसीआरबी’च्या अहवालातील वास्तव; अपहरणाच्या गुन्ह्यंचे प्रमाण सर्वाधिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहान मुलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीवरून दिसत आहे. राज्यात दरदिवशी मुलांवरील हिंसाचाराच्या सरासरी ५१ घटनांची नोंद होत आहे. २०१८ मध्ये लहान मुलांसंबंधित गुन्ह्य़ांच्या १८ हजार ८९२ घटनांची नोंद झाली. यात अपहरण आणि पळवून नेण्याच्या (१०,६२३ ) गुन्ह्य़ांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अहवालातून दिसून येत आहे.

लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, बिहार या राज्यांचा समावेश आहे. राज्यात दरदिवशी लहान मुलांच्या अपहरणाच्या २९ घटना घडत आहेत. अपहरणाच्या घटनांमध्ये १६ ते १८ या वयोगटातील मुलींची संख्या चार हजार २८० एवढी आहे. तर याच वयोगटातील १००२ मुलांचे अपहरण झाले आहे. याखालोखाल १२ ते १६ वयोगटातील मुलींच्या अपहरणाचे प्रमाण असून २०१८ मध्ये २८९४ मुलींचे, तर १३२८ मुलांचे अपहरण झाले होते. १६ ते १८ या वयोगटातील मुलींच्या अपहरणाचे प्रमाण एकूण घटनांच्या तुलनेत ४० टक्केआहे.

लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांचेही प्रमाण राज्यात अधिक आहे. त्यामुळे ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस’ (पोस्को) कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्य़ांची संख्या लक्षणीय आहे. मागील एका वर्षांत पोक्सोअंतर्गत ६२३३ घटना नोंदवण्यात आल्या. देशभरातील पॉस्को घटनांमध्ये १६ टक्के घटना राज्यातील आहेत. त्याचबरोबर लहान मुलांच्या खून होण्याच्या घटनांमध्येही राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २०१७ च्या तुलनेत खुनाच्या घटनांमध्ये २३ टक्क्य़ांची वाढ झाली आहे.

‘मुलांबाबत घडणाऱ्या गुन्हेगारीचे वाढते प्रमाण धोकादायक आहे. मात्र अशा घटना नोंदवण्याचे प्रमाण वाढते आहे. कारण लोकांमधील जागरूकता वाढते आहे. त्याचप्रमाणे अशा घटनांस सहज बळी पडू शकणारी मुले व कुटुंबांची माहिती संकलित केली पाहिजे.

समाजात लहान मुलांसाठी संरक्षक यंत्रणा तयार करून मुलांच्या संरक्षणाशी धोरणे आखायला हवी. मुलांबाबत होणाऱ्या गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी हे आवश्यक आहे,’ असे मत ‘क्राय ’ संस्थेचे पश्चिम विभागाचे प्रादेशिक संचालक क्रिएन राबडी यांनी व्यक्त केले.

अपहरण घटनांची आकडेवारी

वय (वर्ष)  मुले मुली     एकूण

०-६      ११३    १२२   २३५

६-१२     ५४३    ३४१    ८८४

१२-१६        १३२८   २८९४  ४२२२

१६-१८    १००२   ४२८०  ५२८२

एकूण     २९८६   ७६३७  १०६२३

मुलांशी संबंधित गुन्हे

गुन्हे प्रकार    २०१७     २०१८

अपहरण      ८७४८       १०११७

पोक्सो       ५२४८       ६२३३

खून         १४५        १७९

(संदर्भ – एनसीआरबी २०१८)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Every day 51 children in the state suffer from violence abn
First published on: 17-01-2020 at 01:04 IST