मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा( २०२४) शनिवार ६ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा बुधवारी आयोगाकडून करण्यात आली आहे.

राज्य लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ साठी २९ डिसेंबर २०२३ रोजी २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार सदर परीक्षा २८ एप्रिल घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षण लागू करण्याचा कायदा फेब्रुवारी महिन्यात केला. तसेच या कायद्यानुसार शासकीय सेवेतील विविध पदांवरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे आरक्षण लागू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आयोगाने नव्या आरक्षणाप्रमाणे जागा निश्चिती करुन प्रस्ताव पाठविण्याची सूचना राज्य सरकारला केली होती.

हेही वाचा…शिखर बँक घोटाळा : तपास बंद करण्याच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मूळ तक्रारदारांची उच्च न्यायालयात मागणी

तसेच २१ मार्चच्या सूचनेनुसार २८ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली होती. राज्य सरकारने आता सुधारित ५२४ पदांचा प्रस्ताव आयोगाला पाठविला असून त्यानुसार ही पदे भरण्यासाठी ६ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांसाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी ९ते २४ मे पर्यंत असून ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख २४ मे पर्यंत आहे.तसेच भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत २६ मे पर्यंत घेता येईल. तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २७ मे पर्यंत असेल.

विविध संवर्गातील महत्वाची पदे

उप जिल्हाधिकारी, गट-अ (७ पदे),सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (११६ पदे), गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (५२ पदे), सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (४३ पदे)
मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (१९ पदे) , सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (२५ पदे)

हेही वाचा…मुंबई विमानतळावरील धावपट्टी ९ मे रोजी बंद

सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (५२ पदे) , निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (७६ पदे) , सहायक वनसंरक्षक, गट-अ, (३२ पदे), वनक्षेत्रपाल, गट-ब, (१६ पदे) , स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (४५ पदे)