मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना गेल्या आठवडय़ात पावसाने झोडपले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा शासन आदेश आणि रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार २० जुलै रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व नऊ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यातील, तृतीय
वर्ष कला शाखा सत्र ५च्या रद्द झालेल्या विषयांच्या परीक्षा आता २६ जुलै रोजी घेण्यात येणार आहेत.

एमएससी (वित्त) सत्र २, एमएससी व एमएमसी (संशोधन) सत्र २, एमएससी आयटी व सीएस (६० : ४० व ७५ : २५) व एमएससी गणित (८० : २०) सत्र २, एमएससी व एमएमसी (संशोधन) सत्र ३, एमसीए सत्र १, एमए (ऑनर्स) व एम.कॉम (६०:४०) सत्र ४ या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहेत. परीक्षेच्या वेळेत व परीक्षा केंद्रामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तांत्रिक कारणास्तव परीक्षेच्या तारखेत बदल

तृतीय वर्ष कला शाखा सत्र ५ च्या २६ जुलै रोजी होणाऱ्या सर्व विषयांच्या परीक्षा काही तांत्रिक कारणास्तव आता २८ जुलै २०२३ रोजी घेण्यात येणार आहेत, याबाबतचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी प्रसिद्ध केले आहे.