शिरीष पवार, लोकसत्ता 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई:  ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबद्दल असलेल्या उत्सुकतेचे प्रतिबिंब देशभरातील माध्यमांत उमटले आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीपुढे आव्हान उभ्या केलेल्या विरोधकांच्या या आघाडीचा चेहरा कोण असेल इथपासून तर प्रत्यक्षात ही आघाडी कितपत व्यवहार्य ठरेल, अशा प्रश्नांचा ऊहापोह प्रमुख प्रादेशिक, राष्ट्रीय वर्तमानपत्रे करीत आहेत. जागरण डॉट कॉमने उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रासह शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील संपादकीयाचे वृत्त दिले आहे. 

हेही वाचा >>> इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? ओमर अब्दुल्ला यांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले…

दैनिक भास्करने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॉनर्जी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गॅस सिलिंडरच्या दरकपातीवरून केंद्रावर केलेल्या टीकात्मक विधानाचे शीर्षक करून बातमी दिली आहे. विरोधकांच्या आघाडीच्या दबावामुळे केंद्राने गॅस दरात कपात केली, आता आमच्या बैठका जसजशा होतील, तसे तसे आणखी कोणत्या वस्तूंचे भाव कमी होतील, ते पाहाच, असे या नेत्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> घटक पक्षांच्या मान्यतेनंतरच मानचिन्ह

प्रभात खबर या दैनिकाने लालूप्रसाद आणि तेजस्वी यादव मुंबईत पोहोचल्याचे वृत्त ठळकपणे दिले आहे. मुंबईतील बैठकीत विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरणार काय, याचा ऊहापोहही अन्य एका बातमीत करण्यात आला आहे.  ‘दी हिंदूू’मधील एका लेखाचे शीर्षक ‘इंडिया आघाडी आणि मतदारांना अनुकूल करून घेण्यातील अडथळा’ या अर्थाचे आहे. या आघाडीचे गणित कागदावर जुळवून आणल्यासारखे दिसत असले तरी विविध पक्षांतील ‘केमिस्ट्री’ म्हणजेच मेळ कसा साधायचा, असा प्रश्न त्यात अधोरेखित केला आहे. विरोधकांचे एकजुटीचे प्रयत्न सुरू असतानाच ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला भाकप, माकप आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीतीत प्रमुख पक्षांचे नेतेच अनुपस्थित होते. त्याबद्दल ममता यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीची केमिस्ट्री जुळवून आणणे हे किती कर्मकठीण आणि आव्हानात्मक आहे, याची प्रचीती येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excitement about india alliance meeting in mumbai reflected in indian media zws
First published on: 01-09-2023 at 04:19 IST