मुंबई : गोठे, तबेल्यांतील मलमूत्र थेट नद्यांमध्ये सोडण्यात येत असून त्यामुळे नद्या प्रदुषित होत आहेत. गोठे, तबेल्यांतील मलमूत्राचा वापर मुंबईतील उद्यानांमध्ये खत म्हणून केल्यास नद्यांमध्ये होणारे प्रदुषण रोखले जाईल, अशी सूचना भाजपने मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. 

मुंबईत विविध ठिकाणच्या नदी किनारी अनेक गोठे आणि तबेले आहेत. तबेले आणि गोठ्यांमधील मलमूत्र जवळच्या नदी पात्रात सोडण्यात येते. त्यामुळे मुंबईतील नद्यांना नाल्यांचे रूप आले आहे. मुंबईतील विविध गोठे व तबेल्यांमधील मलमूत्र त्या त्या ठिकाणच्या  प्रभागातील उद्यान विभागाकडे सुपूर्द करून त्याचा खतासाठी वापर करावा, अशी मागणी भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी वरील मागणी केली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : म्हाडाच्या सदनिकेचे आमीष दाखवून २१ जणांची फसवणूक, दोन कोटी ३० लाखांची फसवणूक

नदीमध्ये केवळ शेण व मूत्रच नाही, तर जनावरांचे मृतदेहही टाकण्यात येतात. ही बाब किनाऱ्यालगत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर ते महानगरपालिकेकडे तक्रार करतात. मात्र महानगरपालिकेकडून तबेल्याच्या मालकांवर नाममात्र दंडात्मक कारवाई करण्यात येते. तबेल्याच्या मालकांवर कठोर कारवाई होत नसल्याने हे प्रकार वारंवार घडत आहेत. गुराचा मृतदेह दिसू नयेत म्हणून त्यावर शेणाचा ढिग टाकला जातो. त्यानंतर टँकरमधून पाणी सोडले जाते. या पाण्याबरोबर हे मृतदेह नदीत वाहून जातात.

हेही वाचा >>> ‘आपला दवाखान्यां’त १९ दिवसात एक लाख रुग्णांवर उपचार, ‘जी उत्तर’ विभागातील १७ दवाखान्यांत एक लाखांहून अधिक रुग्णांना सेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील विविध वस्त्यांमधील सांडपाणी, मलमूत्र मलवाहिन्यांतून थेट नदीमध्ये सोडण्यात येत आहे. नदीपात्रामधील कचरा स्वच्छ केल्यानंतर चार दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ होते, असेही शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे. मुंबईतील विविध गोठे व तबेल्यांमधील मलमूत्र त्या त्या ठिकाणच्या प्रभागातील उद्यान विभागाकडे सुपूर्द करून त्याचा खतासाठी वापर करावा. या मागणीची तातडीने अंमलबजावणी करून नद्यांमध्ये होणारे प्रदुषण रोखावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.