मुंबई : आधीच कर्जबाजारी, बायको सोडून गेलेली अशा अवस्थेत एका इसमाला तिकिट तपासनीसाने पकडून दंड आकारला. त्यामुळे संतापून त्याने बदला घेण्याचे ठऱवले. त्याने दंडाच्या पावतीच्या आधारे नकली पावती पुस्तक बनवो आणि नकली तिकिट तपासनीस बनून रेल्वे प्रवाशांची लूट करू लागला. या प्रकाराची कुणकुण रेल्वेच्या दक्षता पथकाला लागली आणि सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
आरोपी रामप्रकाश मंडल (४०) विरार येथे राहतो. त्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून तो कर्जबाजारी झाला आहे. पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर त्याची मानसिक स्थिती आणखी बिघडली. एकदा त्याला विनितिकिट प्रवास करताना रेल्वेमध्ये तिकिट तपासनीसाने पकडले. खिशातील पैसे दंडाच्या रकमेपोटी काढून घेतले. आधीच आर्थिक परिस्थिती खराब, त्यात सर्व पैसे तिकिट तपासनीसाने काढून घेतले. त्यामुळे मंडल याला प्रचंड धक्का बसला आणि संतापाने पेटून उठला. या घटनेचा बदला घेण्याचे त्याने ठरवले. त्याच्याकडे असलेली दंडाची पावती त्याने जपून ठेवली आणि नकली तिकिट तपासनीस बनून प्रवाशांकडून दंड आकारायचे ठरवले.
या पावतीमध्ये व्हाईटनर लावून खाडाखोड केली. विरारच्या लक्ष्मी झेरॉक्स येथे जाऊन त्याने पावतीच्या आधारे बनावट पावती पुस्तक तयार केले. बनावट स्टॅप, ओळखपत्र बनवून घेतले. ॲमेझॉनवर ऑर्डर करून रेल्वे तिकिट तपासनीसांकडे असतात तशी ओळखपत्रासाठी गळ्यात अडकविणारी दोरी (आयडी लेस) देखील मागवली. त्यानंतर तो बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यात जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून तिकिट तपासनीस बनून प्रवाशांना लुबाडून लागला. लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये बोगस तिकीट तपासनीस वावरत असल्याची माहिती मुख्य तिकीट निरीक्षकांना मिळाली. त्यानुसार मध्ये रेल्वेचे मुख्य तिकिट निरीक्षक हरेश दहिलकर (५३) यांनी एक पथक तैनात केले.
या पथकात धनंजय यादव, मेहंदी बुटान, संजीव राजपूत, विजय वाघेला, इशांत गजबे हे तिकिट तपासनीस, तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे रामसिंग मिना यांचा समावेश होता. हे पथक मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गोरखपूरला जाणारी ट्रेन क्रमांक ( २२५३८) मध्ये दाखल झाले. बुधवारी दुपारी गाडी कल्याण रेल्वे स्थानक सोडताच तिकिट तपासनीसासारखे कपडे परिधान केलेली एक व्यक्ती प्रवाशांची तिकिटे तपासत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. आम्हा चौघांकडे तिकिट नसून दंडाची पावती बनवून द्या असे त्याला सांगितले. त्या तोतया तिकिट तपासनीसाने २ हजार ६४० रुपयांची चार तिकिटे बनवून दिले.
त्याने बनवलेली दंडाची पावती ही बनावट असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे असलेल्या पावती पुस्तकात एकाच क्रमांकाची सर्व पाने होते. त्याच्या बागेत भारतीय रेल्वेचे बनावट ओळखपत्र, टीटीईचे बनावट ओळखपत्र, मोटरमन सुविधाचे ओळखपत्र आढळले. विरारच्या लक्ष्मी झेरॉक्स येथून त्याने बनावट स्टॅप बनवला होता. आमच्याकडे एका दंडाच्या पावतीच्या तीन प्रती असतात. त्यापैकी एक प्रवाशाला, एक कार्यालयात आणि एक नोंदणीसाठी ठेवली जाते. आरोपी मंडल याने सर्व पावत्या एकाच क्रमांकाच्या बनवल्या होत्या, असे या पथकातील तिकिट तपासनीस विजय वाघेला यांनी सांगितले. आरोपी रामप्रकाश मंडल (४०) विरोधात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२), २०४, २०५, ३३६ (२), ३३६(३), ३४० (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.