मुंबई : नाताळ आणि नववर्षानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक बाहेरगावी जात असून रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण १०० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. प्रवाशांना आरक्षित तिकीट देण्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. तसेच अनेक वेळा बनावट ई-तिकिटे दिली जातात. याविरोधात पश्चिम रेल्वेची कारवाई सुरू आहे.

याप्रकरणी सिल्वासा शहरातील रहिवासी शशी प्रकाश सिंग याला पश्चिम रेल्वे दक्षता पथक आणि सिल्वासा शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ई-तिकीट बनविण्याच्या आरोपाखाली पकडले. इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळावरून बेकायदेशीरपणे ३३ लाख रुपयांहून अधिक किमतीची ई-तिकीटे खरेदी करताना सिंग आढळून आला. ही सर्व तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा – मुंबई : अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

हेही वाचा – मुंबई : पुढील सहा दिवस रात्रीची शेवटची खोपोली लोकल रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेकायदेशीरपणे साॅफ्टवेअर वापरून ई-तिकिटे तयार करणाऱ्या इसमाची माहिती पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाला गुरुवारी मिळाली. या माहितीच्या आधारे, दक्षता पथक आणि सिल्वासा शहर पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला. यात त्याचा लॅपटाॅप आणि साॅफ्टवेअर जप्त केले. आरोपी दोन बेकायदेशीर साॅफ्टवेअर चालवत होता. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाचा गैरवापर करीत होता. त्याने गेल्या ३० दिवसांत ५३९ पीएनआर तयार केले होते. त्याची अंदाजे किमत १४.६२ लाख होती. तर, त्याच्या सर्व ई-मेल आयडीची तपासणी केली असता १७.३६ लाखांची ६३१ ई-तिकीटे आणि १.२० लाख रुपयांची ३८ तत्काळ तिकिटे आढळली. या प्रकरणी सिंगला रेल्वे कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.