सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची घोषणा; टीकेची धार कमी करण्यासाठी प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील ३६ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठीचे अर्जवाटप एक-दोन दिवसात सुरु होणार असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. तर विधिमंडळ अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर विरोधकांच्या टीकेची धार बोथट करण्यासाठी शुक्रवारपासूनच अर्जवाटप सुरु करण्याची तयारी सहकार विभागात वेगाने सुरु झाली आहे. अर्जाचे नमुने ईमेलवर रात्री उशिरापर्यंत सुरूवातीला ५० वाटपकेंद्रांवर पाठविले जाणार आहेत, अशी माहिती विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. रिझव्‍‌र्ह बँकेने कर्जमाफीसाठी परवानगी दिलेली नसून निधीची तरतूदही करण्यात आलेली नाही. पण अर्जप्रक्रियेतच काही महिने लागणार असून आगामी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये आर्थिक तरतूद करुन उर्वरित बाबी यथावकाश केल्या जातील, असे अर्थ व सहकार खात्यातील उच्चपदस्थांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने ३६ लाख शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली आणि कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २५ टक्के किंवा कमाल २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे. त्यासाठी सुमारे ३४ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कर्जमाफीवरुन गेले दोन-तीन आठवडे वादळ उठले असून सरकारने जाहीर केलेली आकडेवारी दिशाभूल करणारी आहे, फुगविलेली आहे, सरकारने पोकळ आश्वासने दिली आहेत, असे टीकास्त्र विरोधकांनी सोडले आहे. तर शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जनजागरण सुरु केले असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु होत असल्याने त्यात कर्जमाफीवरुन शिवसेना व विरोधकांकडून सरकारला धारेवर धरले जाणार आहे.

या पाश्र्वभूमीवर विरोधकांची टीका व शेतकऱ्यांमधील असंतोष कमी करण्यासाठी कर्जमाफीचे अर्जवाटप शुक्रवारपासूनच सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे अर्ज जिल्हाधिकारी, तहसिलदार कार्यालय, सहकार उपनिबंधक कार्यालय व बँकांमध्येही उपलब्ध होतील, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या आवश्यक परवानग्या लवकरच मिळतील, सरकार बँकांना निधी देणार असल्याने त्यास रिझव्‍‌र्ह बँक कोणताही आक्षेप घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अर्जवाटप एक-दोन दिवसात सुरु होईल. शेतकऱ्यांना आवश्यक त्या कागदपत्रांसह ते भरुन द्यावे लागतील. सरकारने जाहीर केलेल्या निकषांनुसार त्या अर्जाची छाननी होईल आणि त्यात बसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. या अर्जाचे नमुने तयार झाले असून ते सर्व संबंधितांना शुक्रवारी सकाळपर्यंत ईमेल पाठवून अर्जवाटप सुरु केले जाणार आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंजुरीआधीच अर्जवाटप

त्यापैकी सुमारे १२ हजार कोटी रुपयांहून अधिक बुडित कर्ज असून त्याला रिझव्‍‌र्ह बँकेने आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर कर्जमाफीसाठीही आवश्यक मंजुरी अद्याप दिलेली नसून अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डी के जैन, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस एस संधू यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची गेल्या आठवडय़ात भेट घेतली होती. रिझव्‍‌र्ह बँकेच्या आक्षेपांवर सरकारने लेखी स्पष्टीकरणही केले आहे. पण रिझव्‍‌र्ह बँकेने अद्याप मंजुरी दिली नसून अर्जवाटप मात्र सुरु करण्यात येत आहे.

पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करणार

कर्जमाफीसाठी आवश्यक निधीची तरतूद आगामी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात येईल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. कर्जमाफीसाठी आवश्यक निधी राज्य सरकार कसा उभारणार आहे, असे विचारता त्याबाबत आवश्यक ती तयारी सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कर्जमाफीच्या अर्ज भरणा व छाननी प्रक्रियेस आठ-दहा महिन्यांचा कालावधी लागणार असून निधीची तरतूद टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या स्त्रोतांमधून करण्यासाठी पावले टाकली जात आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer debt waiver application allocation from today
First published on: 21-07-2017 at 01:25 IST