डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेली शिवाजी पार्कमधील जागा रिकामी करण्याबाबत येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवावर शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेकडून परवानगी घेण्यात आली होती. पालिकेने केवळ एक दिवसाची परवानगी दिली होती. मात्र त्यानंतर अंत्यसंस्कारस्थळ बंदिस्त करून ठेवण्यात आले. या जागेवरच शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याची आग्रही मागणी आता शिवसेनेकडून करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मोठय़ा संख्येने दलित बांधव चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात जनसागर लोटतो. दलित बांधवांसाठी विविध सुविधा येथे उभारण्यात येतात. ६ डिसेंबरची गर्दी पाहता अंत्यसंस्कारस्थळाचे काय करायचे, असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. पालिकेच्या जी-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना एक पत्र लिहून संदर्भात काय करायचे, अशी विचारणा केल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडून कोणताही दुजोरा मिळू शकला नाही. अंत्यसंस्काराची जागा रिकामी करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे उच्च पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहेत. येत्या दोन दिवसात हा निर्णय होईल, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.