मुंबई : राज्यात पसरलेल्या बनावट कॅाल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी झालेल्या कारवाईची ‘फेडरल ब्युरो ॲाफ इन्व्हिस्टेगेशन’ने (एफबीआय) माहिती मागविली आहे. याबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) पाठविलेल्या मेलद्वारे ही माहिती विविध तपशीलांसह सादर करण्याची विनंती केली आहे. याशिवाय एफबीआयचे एक पथकही माहिती घेण्यासाठी भारतात येणार असल्याचे कळते.

राज्यात बनावट कॅाल सेंटरद्वारे अमेरिका, कॅनडा येथील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. विविध मार्गांद्वारे या परदेशी नागरिकांना आमीष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने नाशिक येथील इगतपुरी जवळील रेन फॉरेस्ट या हॉटेल परिसरात छापा टाकून मुंबईतील सहा जणांसह आणखी काही व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी तेथे बेकायदेशीर कॉल सेंटर सुरु होते व सुमारे ६२ कर्मचारी कार्यरत होते. या कारवाईत अनेक आक्षेपार्ह माहिती बाहेर झाली आहे. या कारवाईत अटक केलेल्या व्यक्तींच्या कॅाल डेटावरुन काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही बनावट कॅाल सेंटर्स सुरु होती का, याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. त्या दिशेने तपास सुरु असल्याचेही सांगण्यात आले. याशिवाय अन्य कॅाल डेटाही सीबीआयच्या हाती लागला असून त्याची शहानिशा सुरु आहे. याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांनाही अहवाल पाठवला जाणार आहे. या शिवाय संभाजीनगर, पालघर येथेही याआधी बनावट कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक पातळीवरील एका आयपीएस अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे. सीबीआयने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र बनावट कॅाल सेंटरमागे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याची भीती व्यक्त केली आहे. बनावट कॅाल सेंटरचे केंद्र ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने होते. त्यानंतर ते पालघर व आता नाशिक येथे का हलविले गेले, याचाही सीबीआय तपास करीत आहे. या कारवाईबाबत माहिती मिळाल्यानंतर एफबीआयने सीबीआयला मेल पाठवून अधिक तपशील मागविला आहे. आवश्यकता भासल्यास भारतात अधिक तपासासाठी येण्याची शक्यताही वर्तविली आहे. भारत-अमेरिका सामंजस्य करारानुसार, संबंधित गुन्हेगारांच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती सीबीआय गोळा करीत असून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांकडून काही व्यक्तींना मोठी रक्कम हस्तांतरित झाली असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या प्राथमिक निष्कर्ष अहवालातील माहितीनुसार, या कारवाईत बेकायदा क्रिप्टोकरन्सी तसेच अनेक बोगस खाती उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत सीबीआय तसेच आता सक्त वसुली संचालनालयानेही चौकशी सुरु केली आहे.