मुंबई : सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा, सुकामेवा आदी खाद्यपदार्थांची मागणी वाढते. त्यामध्ये भेसळ होऊन अन्नपदार्थाचा दर्जा व गुणवत्ता घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम हाती घेतली असून ११ ऑगस्टपासून आतापर्यंत ४२ आस्थापनांची तपासणी करून ५५ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये तब्बल २१८ किलो बनावट पनीर व ४७८ लिटर दूध नष्ट करण्यात आले.

गणेशोत्सव व त्यापाठोपाठ येणाऱ्या नवरात्र, दसरा व दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाने ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ या अभियानांतर्गत ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत २५ ऑगस्ट रोजी एफडीए व मुंबई पोलीस यांनी संयुक्तरित्या ॲन्टॉप हिल येथे केलेल्या कारवाईत लेबल नसलेल्या चीज ॲनालॉग या पनीर सदृश्य अन्न पदार्थाची विक्री होत असल्याचे आढळले. या ठिकाणाहून चीज ॲनालॉगचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन ५४ हजार ६२५ रुपयांचा २१८ किलो चीज ॲनलॉगची पनीर नष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे १९ ऑगस्ट रोजी एफडीए व मुंबई पोलीस यांनी दहिसर पूर्व येथे धाड टाकून विविध कंपन्याच्या २९ हजार २७७ किमतीच्या ४७८ लिटर दुधाचा साठा नष्ट करण्यात आला. वरील सर्व नमुने विश्लेषणाकरिता प्रयोगशाळेत पाठविले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

मिठाई खरेदी करताना काय काळजी घ्यावी

मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी पाकीटावर बॅच नंबर, लॉट नंबर, युज बाय डेट, तसेच उत्पादन दिनांक, अन्न नोंदणी क्रमांक, अन्न परवाना क्रमांक इत्यादी माहिती बघून तपासूनच खरेदी करावे. त्याबाबतचे खरेदी बिल घ्यावे. अशा स्वरूपाची माहिती नसेल तर पदार्थ खरेदी करणे टाळावे. मिठाई खरेदी केल्यानंतर ती लवकर संपवावी. आपण घेत असलेली मिठाई ताजी व सकस आहे का याची खातरजमा करावी.

नागरिकांना आवाहन

कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असून कोणत्याही अन्नपदार्थाची गुणवत्ता व दर्जाबाबत तक्रार असल्यास किंवा मावा अथवा खवा चांगल्या दर्जाचा नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत सविस्तर माहिती १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी केले आहे.

ज्या आस्थापनांमध्ये तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. – मंगेश माने, सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन