लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या परीक्षेतील प्रतीक्षा यादीत असलेल्या एमबीबीएस उमेदवारांना तातडीने नियुक्ती देवून, मार्च महिन्याअगोदर डॉक्टरांची नवीन भरती प्रकिया करण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत.

रायगड जिल्ह्यातील आरोग्य विषयक बाबींचा आढावा रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थित घेण्यात आला. या बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव वीरेंद्र सिंह, आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर व आरोग्य विभागातील वरिष्ट अधिकारी उपस्थित होते.

रुग्णालयात गैरहजर राहणाऱ्या बंधपात्रित डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या असून, सर्व रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध राहावेत, अशी सक्त ताकीद संबंधित डॉक्टरांना देण्यात आली आहे. आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी व विशेषतज्ञ यांना परत सेवेत घेण्यात येणार असून, त्यासाठी वेळप्रसंगी नियमात बदल करण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्र्यांनी दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्यातील वाढते औद्योगीकीकरण व मुंबई-गोवा महामार्गवरील अपघात यामुळे ट्रॉमा केअर सेंटर वाढवण्याची, दोन डायलेसिस सेंटर वाढवण्याची तसेच डॉक्टरांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी केली. या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रायगड जिल्हातील आरोग्य आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.