मुंबई  : पत्नीच्या पाकिस्तानातील प्रभावी कुटुंबियाने तिला आणि आपल्या दोन अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याचा दावा बॉलिवूड चित्रपट निर्माता मुश्ताक नाडियादवाला यांनी केला आहे. तसेच आपल्या कुटुंबियांना पाकिस्तानातून सुरक्षित आणण्याचे आदेश भारत सरकारला देण्याच्या मागणीसाठी निर्मात्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेची दखल घेऊन केंद्र सरकारला याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाला नोटीस बजावली व प्रकरणाची सुनावणी २९ ऑगस्ट रोजी ठेवली.

नाडियादवाला यांनी वकील बेनी चॅटर्जी यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. पत्नीच्या कुटुंबियाने तिच्यासह आपला नऊ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या मुलीला पाकिस्तानात बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवले आहे. कुटुंबियांना सुरक्षितरीत्या परत आणण्यासाठी नाडियादवाला यांनी केंद्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे भारतीय नागरिक असलेल्या आपल्या दोन मुलांना संरक्षण देऊन त्यांना परत आणण्याचे कर्तव्य पार पाडण्यात भारत सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना दिलेल्या प्रवास व्हिसाची मुदत ऑक्टोबर २०२१ मध्ये संपली असून पत्नी मरियम चौधरी आणि दोन्ही मुलांना बेकायदेशीरपणे पाकिस्तानात ठेवण्यात आले आहे. कोणतेही तर्कसंगत कारण न देता पत्नीने भारतात परतण्यास नकार दिला, असा दावाही याचिकाकर्त्याने केला आहे. याचिकेनुसार, या चित्रपट निर्मात्याचे एप्रिल २०१२ मध्ये पाकिस्तानी तरूणीशी पाकिस्तानातच लग्न झाले. त्यानंतर ती भारतात आली आणि येथे आल्यानंतर तिने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला. त्यांना दोन मुलेही झाली. नोव्हेंबर २०२० मध्ये मरियम मुलांना घेऊन पाकिस्तानला गेली. फेब्रुवारी २०२१ मध्ये तिने लाहोर न्यायालयासमोर मुलांच्या कायदेशीर पालकत्वासाठी अर्ज केला व न्यायालयानेही तिचा अर्ज मान्य केला. तिथेच राहण्यासाठी पत्नीवर दबाव टाकण्यात आला असावा किंवा तिला तसे शिकवले गेले असावे. मुलांना अशाप्रकारे बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवणे केवळ दोन्ही देशांच्या इमिग्रेशन कायद्यांचे आणि मुलांच्या कल्याण आणि संगोपनाच्या अधिकाराचेही उल्लंघन असल्याचा दावा नाडियादवाला यांनी केला आहे.