पाच एकरचा भूखंड जूनपर्यंत यशराज फिल्मला भाडेतत्त्वावर; शैक्षणिक उद्देशाला हरताळ

नीलेश अडसूळ

मुंबई : विद्यापीठाच्या मालकीच्या जागांचा वापर केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच व्हावा, असे स्पष्ट संकेत असतानाही मुंबई विद्यापीठाने कलिना संकुलातील पाच एकरचा भूखंड एका वेबमालिकेच्या चित्रीकरणासाठी दिला आहे. यशराज फिल्मला जूनपर्यंत देण्यात आलेल्या या भूखंडाच्या भाडय़ातून विद्यापीठाला लाखोंचे उत्पन्न मिळणार असले तरी, यामुळे चुकीचा पायंडा पडू शकतो, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत. अशा प्रकारे उत्पन्नासाठी विद्यापीठातील जागा लग्नसोहळे आणि राजकीय कार्यक्रमांनाही दिली जाईल, अशी भीती अधिसभा सदस्यांनी व्यक्त केली आहे.

कलिना येथील क्रीडासंकुलोसमोरील पाच एकर जागा यशराज फिल्मला आठ महिन्यांसाठी देण्यात आली असून तेथे भोपाळ वायू दुर्घटनेवर आधारित वेबमालिकेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. यासाठी नेपथ्य उभारण्यात आले असून चित्रीकरणाची प्राथमिक तयारीही सुरू झाली आहे. मात्र, विद्यापीठाचा हा निर्णय आता वादात सापडला आहे. 

पहिल्या महिन्यात प्रति एकर एक लाख रुपये भाडे व त्यानंतर प्रति एकर दोन लाख रुपये भाडे विद्यापीठाने आकारल्याचे समजते.  विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय झाल्यांनतर ही जागा चित्रीकरणासाठी दिल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली. मात्र, शैक्षणिक उद्देशासाठी दिलेल्या जागेचा विद्यापीठाकडून पैसे कमावण्यासाठी वापर होत असून विद्यापीठाच्या कारभाराचा अधिसभा सदस्यांकडून निषेध करण्यात येत आहे. या संदर्भात कुलसचिव सुधीर पुराणिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

विद्यापीठाने जागा द्यावी का?

विद्यापीठांच्या जागांवर केवळ शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे असा संकेत आहे. पाच एकरचा भूखंड इतक्या दीर्घ कालावधीसाठी दिल्याने विद्यापीठातील शैक्षणिक वातावरणाला गालबोट लागू शकते. शिवाय त्याची जबाबदारी विद्यापीठ घेणार आहे का? विद्यापीठावर इतकी वाईट वेळ आली आहे का? याबाबत विद्यापीठाने स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जागा अत्यल्प दरात

अनेक विद्यापीठांत, महाविद्यालयांत चित्रीकरणाला परवानगी दिली जाते; परंतु त्यांचे काही निकष संबंधित प्रशासनाने ठरवलेले असतात. विद्यापीठाकडे असे कोणतेही निकष नाहीत. शिवाय वास्तू देणे आणि भूखंड देणे यात फरक आहे. ‘हा केवळ पैसे मिळवण्यासाठी घातलेला घाट आहे. मुंबईतील जागांचे दर पाहता ही जागा अत्यल्प दरात देण्यात आली आहे. त्यामुळे जागा नेमकी का देण्यात आली? यामागील बोलाविता धनी कोणी वेगळा आहे का?’ असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

याआधी पुण्यातही प्रकार

साधारण तीन वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. पुणे विद्यापीठाच्याही व्यवस्थापन परिषदेने चित्रीकरणासाठी मान्यता दिली होती. मात्र, विद्यार्थी, शिक्षक, अधिसभा सदस्यांच्या विरोधानंतर विद्यापीठाला निर्णय मागे घ्यावा लागला होता.

भूखंडाचा करार

विद्यापीठाने हा भूखंड सिद्धेश एन्टरप्रायजेस या कंपनीला भाडेकराराने दिला आहे. या कराराअंतर्गत यशराज फिल्म ही निर्मिती संस्था भोपाळ दुर्घटनेवर आधारित वेबमालिकेचे चित्रीकरण करीत आहे. विद्यापीठात रेल्वेचे डबे, मार्गिकांचे नेपथ्य उभारले जात आहे.

आज चित्रीकरणाला जागा दिली, उद्या तेथे विवाह सोहळे, राजकीय सभाही होतील. पैसे कमावण्यासाठी या जागा नाहीत, याचे विद्यापीठाला भान असायला हवे. तसे असेल तर शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यापीठाने उत्पन्न मिळवावे. विद्यापीठाला आताच आवर घातला नाही तर उद्या संकुलाची चित्रनगरी होईल.

सुधाकर तांबोळी, अधिसभा सदस्य