मुंबई : एकत्र कुटुंब पध्दती आणि काळाच्या ओघात बदलत गेलेले नातेसंबंध यावर भाष्य करणाऱ्या ‘वाडा चिरेबंदी’ या अभिजात नाट्यकृतीचे समारोपाचे प्रयोग सध्या अमेरिकेत सुरू आहेत. प्रसिध्द नाटककार महेश एलकुंचवार लिखित आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय ठरले. आता या लोकप्रिय नाट्यकृतीचे काही मोजके प्रयोग अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांसमोर सादर करून हे नाटक थांबणार आहे. सध्या अमेरिकेत ठिकठिकाणी मराठी नाट्यरसिकांच्या गर्दीत या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत.

अमेरिका दौऱ्यात ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचा प्रयोग नुकताच वॉशिंग्टन डीसी येथे सादर करण्यात आला. आता १० मे रोजी डेट्रॉईट, ११ मे रोजी शिकागो, १६ मे रोजी ऑस्टीन, १७ मे रोजी डलास, १८ मे रोजी लॉस एन्जलीस, २३ मे रोजी सॅन डियागो आणि २५ मे रोजी सॅन जोसे येथे या नाटकाचे पुढील प्रयोग होणार आहेत. ‘अमेरिकेत सध्या अनेक संस्था मराठी नाटकांचे आयोजन करतात. त्यांच्या या उत्साहाला प्रतिसाद देत रंजनाचा आनंद त्यांनाही द्यावा या भावनेने आम्ही हे समारोपाचे प्रयोग अमेरिकेत सादर करत आहोत’ असे या नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले. अमेरिकेत स्थायिक असलेल्या शैलेश शेट्ये आणि प्रमोद पाटील यांच्या ‘फाईव्ह डायमेन्शन्स’ या संस्थेच्या वतीने ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचा अमेरिका दौरा आयोजित करण्यात आला आहे.

मान्यवर कलाकारांच्या भूमिका

‘जिगीषा – अष्टविनायक’ निर्मित, महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकात नव्या – जुन्या नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेता वैभव मांगले, अभिनेता – दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्यासह पूर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, राजश्री गढीकर, धनंजय सरदेशपांडे, विनिता शिंदे, सिमरन सैद आणि नव्या प्रसिध्द कलाकारांपैकी एक असलेल्या अभिनेता अजिंक्य ननावरे यांच्या या नाटकात भूमिका आहेत. तर दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर हे या नाटकाचे निर्माते आहेत.