अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मुदत देणार

दादर पूर्व येथील नायगाव परिसरातील ४२ मजली आर ए रेसीडेन्सी इमारतीला अग्निशमन दलातर्फे उद्या नोटीस बजावण्यात येणार आहे. इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे आग विझवण्यास तब्बल सात तासांचा अवधी लागला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर इमारतीली अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महिन्याभराची मुदत दिली जाणार आहे.

हेही वाचा >>>मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चं आयोजन; लव्ह जिहाद, धर्मांतरणविरोधात कायदा करण्याची मागणी

दादर पूर्व येथे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या समोर नव्यानेच बांधण्यात आलेल्या आर ए रेसीडेन्सी या आलिशान गगनचुंबी इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर गुरुवारी रात्री साडेआठ वाजता आग लागली होती. मात्र इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. अग्निशमन दलाच्या अग्निमोचक वाहनावरील उच्च दाबाचे अवजड पंप हातात घेऊन अग्निशामक जवानांनी अक्षरशः ४२ मजले चढून पार केले. प्रत्येक दहा मजल्यानंतर तिथे पंप जोडून जलवाहिनी वरच्या मजल्यापर्यंत नेली जात होती. ४२ मजल्यापर्यंत सर्व यंत्रणेसह पोहोचण्यास मध्यरात्रीचा एक वाजला होता. त्यामुळे आगीचा स्तर पाच क्रमांकाचा असल्याचे घोषित करण्यात आले होते. एक वाजल्यानंतर प्रत्यक्ष आग विझवण्याचे काम सुरू झाले व संपूर्ण आग आटोक्यात येण्यास मध्यरात्रीचे साडेतीन वाजले होते. इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे ही आग विझवण्यास वेळ लागला. ४२ व्या मजल्यावर ज्या सदनिकेत आग लागली होती. त्या सदनिकेतून ती पसरली नाही, त्यामुळे जिवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली नाही.

हेही वाचा >>>लिंगायत समाजाच्या महामोर्चावरून सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी इमारतीला सोमवारी नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख संजय मांजरेकर यांनी दिली. सुरुवातीला इमारतीला तीस दिवसांची नोटीस दिली जाणार आहे. इमारतीच्यावतीने काम सुरू आहे असे दिसल्यास ही मुदत वाढवून दिली जाईल. अन्यथा इमारतीचे पाणी व वीज कापण्याची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.