मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) दहिसर – मीरारोड मेट्रो ९ मार्गिकेची उभारणी करीत आहे. ही मार्गिका मीरारोड येथील प्लेझंट पार्क, हटकेश आणि सिल्व्हर पार्क जंक्शन या एक किमीच्या परिसरातून जाणार असून मेट्रो ९ मार्गिकेमुळे या परिसरादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एमएमआरडीएने डबल डेकर उड्डाणपूल बांधला आहे. एक किमी लांबीच्या आणि ५.५ मीटर उंचीचा हा उड्डाणपूल बुधवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालक, प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून प्लेझंट पार्क, हटकेश आणि सिल्व्हर पार्क जंक्शनदरम्यानची वाहतूक कोंडी दूर होण्यास आता मदत होणार आहे. तर मीरारोडमधील हा उड्डाणपुल पहिला डबलडेकर उड्डाणपूल ठरला आहे.

हेही वाचा >>> म्हाडाच्या मुंबई मंडळाची १३ सप्टेंबरची सोडत अखेर लांबणीवर; अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ

दहिसर – मिरारोड दरम्यान १०.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका आहे. आता या मार्गिकेचा उत्तनपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. ही मार्गिका मीरारोड येथील प्लेझंट पार्क, हटकेश आणि सिल्व्हर पार्क जंक्शन मार्गावरून जाताना मेट्रो मार्गिकेमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. रस्ते वाहतुकीसाठी जागा अपुरी पडणार असल्याने अखेर एमएमआरडीएने येथे डबलडेकर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. खाली रस्ता, त्यावर मेट्रोचे खांब, मेट्रोच्या खांबावर उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो मार्गिका अशी रचना आहे. रस्ते वाहतुकीसाठीचा हा उड्डाणपूल एक किमी लांबीचा आणि ५.५ मीटर उंचीचा आहे. या उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम अत्यंत आव्हानात्मक होते. हे आव्हान यशस्वीपणे पेलत दोन वर्षात उड्डाणपुलाचे काम पूर्ण करत बुधवारी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. या उड्डाणपुलामुळे प्रवाशाच्या वेळेत ८ ते १० मिनिटांची बचत होणार असून वाहतूक कोंडी दूर होईल, असा दावाही त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.