बोरीबंदर ते ठाणे अशी आशिया खंडातील पहिली रेल्वे सेवा सुरू होऊन १६ एप्रिल २०१८ रोजी १६५ वर्षे पूर्ण होतील. मात्र एवढय़ा वर्षांतही मुंबई उपनगरीय रेल्वेचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. रखडलेले प्रकल्प, रेल्वेबरोबरच राज्य सरकारचेही न मिळणारे सहकार्य अशा अनेक कारणांमुळे रेल्वेचा ‘विकास’ दूरच राहिला, अशी टीका रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. आशिया खंडातील पहिल्या रेल्वे सेवेला १६५ वर्षे पूर्ण होत असल्याने रेल्वे आणि प्रवासी संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ३.३५ वाजता बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली. ३३.८ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ५७ मिनिटे लागली. १४ डब्यांच्या या गाडीत त्या वेळी ४०० प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर या सेवेचा विस्तार कल्याण, खोपोली, खंडाळापर्यंत वाढविण्यात आला. हा विस्तार वाढविण्यात आला असला तरी मुंबई उपनगरीय रेल्वेचा विकास म्हणावा तसा झालेला नाही, अशी टीका रेल्वे प्रवासी संघटनांकडमून करण्यात येत आहे.
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील रेल्वेचा विकास व्यवस्थित झाला नसल्याचे ठाणे रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले. प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामानाने सुविधा आहेत कुठे. प्रकल्प रखडतात आणि त्यामुळे खर्च वाढतो आणि अनेक समस्या निर्माण होतात. ठाणे हे गेल्या काही वर्षांत गजबजलेले स्थानक म्हणून ओळखले जाते; परंतु ऐतिहासिक अशा ठाण्याची ओळख नष्ट होत आहे. रेल्वेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. रेल्वेची सुधारणा करण्याची पद्धत शासकीय आहे आणि हेच कारण रेल्वेचा विकास विलंबाने होण्यास ठरत आहे. यात बदल झाला पाहिजे. इंग्रजांनी भविष्याचा विचार केला. मात्र हाच विचार रेल्वे आणि सरकारने केला नाही. त्यामुळे मुंबई रेल्वेची सुधारणा झालेली नाही. राज्य सरकारही तेवढेच कारणीभूत असल्याचा आरोप उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या उपाध्यक्ष लता अरगडे यांनी केला.
१६५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने प्रवासी संघटनांकडून ठाणे स्थानकात फलाट क्रमांक दोनवर केक कापून हा दिवस साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबरच रेल्वेतील गँगमन, स्टेशनमास्तर इत्यादी कर्मचाऱ्यांचा सत्कारही केला जाईल.