मुंबई : भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेकडून महाविद्यालयांना मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे यंदा औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष फक्त सहा महिन्यांचेच असणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने या पदविका अभ्यासक्रमांच्या पहिल्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून, वार्षिक परीक्षा ३० एप्रिल २०२६ पासून सुरू होणार आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) पदविका अभ्यासक्रमाच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यंदाचे शैक्षणिक वर्षाचा कालावधी २४ ऑक्टोबर २०२५ ते १८ एप्रिल २०२६ असा असणार आहे. त्यातही विद्यार्थ्यांच्या परीक्षा ३० एप्रिल रोजी सुरू होणार असल्याने अवघ्या पाच महिन्यांमध्ये संस्थांना संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. औषधनिर्माणाशास्त्र पदविका अभ्यासक्रमाचे सत्र हे सामान्यत: नऊ ते दहा महिन्यांचे असते; मात्र यंदा भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेकडून महाविद्यालयांना मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे प्रवेश प्रक्रिया सप्टेंबर अखेरीस सुरू झाली. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना फक्त पाच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. या कालावधीत तीन अंतर्गत परीक्षा घेण्यात येणार आहेत.
दरवर्षी उशिरा मिळणाऱ्या मान्यतेमुळे फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत आणि सत्रांच्या वेळापत्रकात निर्माण होणारा गोंधळ कायम असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. यंदाही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांना ‘क्रॅश कोर्स’च्या स्वरूपात शिक्षण घ्यावे लागणार आहे.
या कालावधीत परीक्षा
पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये पहिली अंतर्गत परीक्षा १५ ते १९ डिसेंबर २०२५, दुसरी ९ ते १४ फेब्रुवारी २०२६ आणि तिसरी ६ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहे. अंतिम सराव परीक्षा २० ते २५ एप्रिल २०२६, तर परीक्षा ३० एप्रिलपासून सुरू होईल.