निखील मेस्त्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या साकीनाका भागात महिलेवर अमानुष अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबईसह संपूर्ण राज्य सुन्न झाले. अमानुषपणे महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेत पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. निर्भया बलात्कार हत्याकांडासारख्या प्रकरणाला काही दिवस उलटत नाही तोच मुंबईलगत असलेल्या पालघर जिल्ह्याच्या बोईसर परिसरात एका पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पालघर तालुक्यातील बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका परिसरात या पाच वर्षीय मुलीबरोबर सोमवारी रात्रीच्या सुमारास अकरा वर्षीय अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अतिप्रसंग करणारा आरोपी ११ वर्षीय आहे. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयासमोर (जुविलीयन कोर्ट) हजर केले जाणार असल्याची माहिती बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम यांनी दिली आहे.

दरम्यान, टाळेबंदी शिथिल होऊ लागताच महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत मुंबईत बलात्काराचे ५५० गुन्हे दाखल झाले आहेत. तर विनयभंगाचे सुमारे ११०० गुन्ह्यांची नोंद झाली. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.

उल्हासनगरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

उल्हासनगर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या स्कायवॉकवरून जात असलेल्या १५ वर्षीय मुलीला हातोड्याचा धाक दाखवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. आरोपीने तरुणीला रात्रभर कोंडून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी श्रीकांत गायकवाड (३०) या आरोपीला अटक केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five year old girl tortured by 11 year old boy in boisar abn
First published on: 14-09-2021 at 12:19 IST