मुंबई : राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे ‘सणासुदीनिमित्त विशेष तपासणी अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियाना’ला अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्राहकांना निर्भेळ शुद्ध, स्वच्छ व उत्तम प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्याचे, आवाहन धीरज कुमार यांनी केले.
गणेशोत्सव, ईद, नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी या सणांच्या काळात मिठाई, मोदक, फराळ, प्रसाद यासारख्या खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. या वाढत्या मागणीत काही अन्न व्यावसायिकांकडून अयोग्य किंवा भेसळयुक्त अन्नाची विक्री होण्याचा धोका असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने हे अभियान हाती घेतले आहे. ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत अंमलबजावणी, जनजागृती आणि प्रचार-प्रसिद्धी या तीन मुख्य घटकांवर भर दिला जाणार आहे.
अभियानाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळे, मिठाई उत्पादक, मोदक व फराळ तयार करणारे महिला बचत गट यांच्यासाठी अन्न स्वच्छतेवरील कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, तसेच इतर शहरांतही अशाप्रकारचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री व राज्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विभागाने पुढाकार घेऊन काम करावे व अंमलबजावणीमध्ये आपला विभाग अग्रस्थानी राहील याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील अन्न तपासणी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात येत आहे. विभागासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे धीरज कुमार यांनी यावेळी सांगितले.
तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
या सणासुदीच्या काळात अन्नपदार्थात भेसळ होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. सण-उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अन्न व्यवसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी केली. नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ वर अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जाबाबत तक्रार करावी, असे आवाहनही सह आयुक्त मंगेश माने यांनी केले.