मुंबई : पोलीस ठाण्यातच शिंदे गटाचे माजी आमदार महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे माजी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. गायकवाड यांच्यासह त्यांच्या तीन साथीदारांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली.
कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यात जाणूनबुजून गोळीबार करण्यात आला. या कृत्याबाबत सौम्य दृष्टीकोन बाळगता येणार नाही. तसे केले आणि अशी कृत्ये करणाऱ्या व्यक्तींना जामीन दिल्यास तो कायद्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे सिद्ध होईल. तसेच, त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि न्यायालयांचे अधिकार कमकुवत होतील, असे निरीक्षणही न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने गायकवाड यांना जामीन नाकारताना नमूद केले. याचिकाकर्त्याने पोलीस ठाण्यात केलेले कृत्य धक्कादायक असून हे कायद्याच्या, राज्याच्या उद्दिष्टावर घाला घालण्यासारखे असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.
पोलीस ठाणे ही युद्धभूमी नाही. सामान्य नागरिकांनी, विशेषतः माजी आमदाराने, लोकप्रतिनिधींनी शस्त्र घेऊन पोलीस ठाण्यात जाणे अपेक्षित नाही. त्यांच्या अशा वर्तनाने लोकप्रतिनिधींबद्दल समाजात भीती आणि दहशतीचा संदेश जाईल. याचिकाकर्ते गणपत गायकवाड यांना हल्ल्या करण्यास मदत केल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने त्यांचे अंगरक्षक हर्षल केणे आणि दोन सहकारी, कुणाल दिलीप पाटील व नागेश दीपक बडेराव यांनाही जामीन नाकारला, या चौघांवरही खुनाचा करण्याचा प्रयत्न,पोलिस ठाण्यात दहशत निर्माण करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाचे निरीक्षण
पोलिस ठाण्यातील अशा प्रकारच्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशी कृती भीती आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करते. अशा प्रकारांनी राजकीय शक्ती किंवा दोन गटांच्या हिंसाचारासमोर पोलिस यंत्रणा देखील असहाय्य होऊ शकते, असा चुकीचा संदेशही जाऊ शकतो हेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. अशा कृतींना वेळीच रोखले नाही किंवा अशा प्रकरणाकडे सौम्यतेने पाहिले, तर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि न्याय वितरण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो, असे न्यायालयाने नमूद केले. गणपत गायकवाड यांच्या पत्नी विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे, साक्षीदारांवर दबाव आणणा जाण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीचे स्वातंत्र्य मौल्यवान असले तरी, गंभीर गुन्हे करण्याचा परवाना त्यांना दिला जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने गणपत गायकवाड यांची याचिका फेटाळताना स्पष्ट केले.
प्रकरण काय ?
शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड दोघेही जमिनीच्या वादाप्रकरणी एकमेकांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी २ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यात गेले होते. तेथे दोघांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी अचानक गणपत गायकवाड आणि हर्षल केणे यांनी आपल्या बंदुकीतून महेश आणि राहुल गायकवाड यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्या. यानंतर गणपत गायवाड यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली.