मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) चार नव्या सुसरी आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्राणीसंग्रहालयात आता एकूण सहा सुसरी आणि मगरी आहेत.

राणीच्या बागेत काही वर्षांपूर्वी मगर आणि सुसर यांच्यासाठी काचेची प्रदर्शनी (क्रॉक ट्रेल) निर्माण करण्यात आली आहे. ज्यात मगर आणि सुसरींच्या पाण्याखालील हालचाली पर्यटकांना काचेतून स्पष्टपणे पाहता येतात. दरम्यान, या क्रॉक ट्रेलमध्ये नुकतेच रांची येथील ‘भगवान बिरसा जैविक उद्यान व प्राणिसंग्रहालया’तून नवीन चार सुसरी आणण्यात आल्या आहेत. आधीच्या दोन आणि आता नवीन आणलेल्या चार अशा मिळून प्राणिसंग्रहालयात एकूण सहा सुसरी आणि एक मगरी आहेत. त्यात क्रॉक ट्रेलमध्ये तीन मगरी होत्या. दरम्यान, नवीन सुसरींना काही दिवस विलग ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना क्रॉक ट्रेलमध्ये सोडण्यात आले आहे. सुसरींच्या बदल्यात चार पांढरे कॉकीटेल व चार राखाडी कॉकीटेल पक्षी ‘भगवान बिरसा जैविक उद्यान व प्राणिसंग्रहालया’ला देण्यात आले आहेत. या सुसरींचे वय ६ ते ८ वर्षे इतके असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला दररोज हजारो पर्यटक भेट देतात. शाळांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा हमखास राणीच्या बागेत बच्चे कंपनी आपल्या पालकांसह मोठ्या प्रमाणात येतात. दरम्यान, आशिया खंडात प्रथमच राणीच्या बागेत अशा प्रकारची मगर व सुसर प्रदर्शनी ( क्रॉक ट्रेल) विकसित करण्यात आली असून या सुविधेमध्ये थ्रीडी फ्लोअरिंग, अॅक्रेलिक काच, अंडरवॉटर व्हयू तसेच प्रदर्शन गॅलरी तयार करण्यात आली आहे. प्रदर्शन गॅलरीमध्ये प्रत्यक्ष त्यांच्या अधिवासाचा हुबेहूब देखावा तयार करण्यात आला असून थ्रीडी फ्लोअरिंगमुळे पर्यटकांना मगर व सुसरींचे नैसर्गिक अधिवासातील वास्तव्यही जवळून अनुभवता येईल. या प्रदर्शनाचे क्षेत्रफळ सुमारे ४००० चौ.मी. असून अंदाजे १० लाख लिटर क्षमतेचा मोठा जलाशय मगर व सुसरींना पोहण्यासाठी तयार करण्यात आला आहे.