लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नणंद असल्याचे भासवून मोबाइलवर संदेश पाठवून एका भामट्याने वृद्ध महिलेला तीन लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

चेंबूरमधील सिंधी सोसायटी परिसरात वास्तव्यास असलेल्या भावना बजाज (६) यांना काही दिवसांपूर्वी अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या पतीच्या बहिणीच्या नावाने मोबाइलवर संदेश आला. आपल्याला तात्काळ एक लाख रुपयांची गरज असल्याचे त्या संदेशात नमुद करण्यात आले होते. नणंदेला पैशांची गरज असल्याने त्यांना वाटले. त्यामुळे ही बाब सासूला सांगून त्यांनी तत्काळ बँकेत जाऊन संदेशात नमुद केलेल्या बँक खात्यावर पैसे जमा केले. त्यानंतर पुन्हा याच मोबाइलवरून आणखी दोन लाखांची मागणी करण्यात आली. त्यानुसार महिलेने पुन्हा एकदा बँकेत जाऊन दोन लाख रुपये पाठवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर पुन्हा एकादा सात लाख रुपयांची मागणी संदेशाद्वारे करण्यात आली. या प्रकाराचा संशय आल्याने महिलेने अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या नणंदेशी संपर्क साधला. आपण आशा प्रकारचा कुठलाही संदेश पाठवलेला नसल्याचे तिने सांगितले. आपला फोन काही दिवसांपूर्वी हॅक झाल्याची माहिती तिने भावना बजाज यांना दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.