मुंबई : बेस्ट उपक्रमाने ‘बेस्ट चलो अॅप’ आणि ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’च्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने प्रवासभाडे प्रदान करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. या पर्यायाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना बेस्टच्या बसमध्ये सर्वप्रथम प्रवेश देण्यात येणार आहे. ही सुविधा १ मार्चपासून उपलब्ध होणार आहे. मात्र, या सुविधेमुळे डिजिटल माध्यमांचा वापर न करणाऱ्या प्रवाशाची गैरसोय होणार असून, या प्रवाशांना बेस्टकडून दुय्यम स्थान देण्यात येणार का, अशी कुजबुज प्रवाशांमध्ये सुरू आहे.
बेस्ट बसमध्ये सर्वात आधी प्रवेश करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना त्यांच्या मोबाइलच्या माध्यमातून ‘बेस्ट चलो अॅप’ किंवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’द्वारे प्रवासभाडे अदा करावे लागेल. डिजिटल पद्धतीने प्रवासभाडे आकारणीमुळे प्रवाशांना सुट्ट्या पैशांची अडचण निर्माण होणार नाही, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
डिजिटल पद्धतीचा प्रसार आणि वापर मोठ्याप्रमाणावर होण्याकरीता बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता अतिरिक्त सुविधा १ मार्चपासून देण्यात येणार आहेत. याअंतर्गत ‘बेस्ट चलो अॅप’ अथवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’चा अवलंब करणाऱ्या प्रवाशांना बेस्ट उपक्रमाच्या बसमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. विशेषत सुरुवातीच्या बसथांब्यावर अशा प्रवाशांना सर्वप्रथम प्रवेशाची सुविधा राहील. ऑनलाइन रिचार्जच्या सुविधेसह बसमधील वाहकाकडूनदेखील रिचार्जची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बेस्ट उपक्रमाने उपलब्ध केलेल्या ‘बेस्ट चलो अॅप’ किंवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’ या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे बेस्ट उपक्रमातर्फे आवाहन करण्यात आले आहे.