मुंबई – प्लास्टिकच्या पिशव्या व वस्तूंविरोधातील थंडावलेल्या कारवाईला आता पुन्हा एकदा वेग येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने पुन्हा या कारवाईसाठी पथके तयार केली आहेत. या पथकात पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांचाही समावेश राहणार असून सोमवारी २१ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात होणार आहे. या कारवाईत ग्राहकांवरही पथकाची नजर राहणार आहे.

प्लास्टिकच्या पिशव्या एकदाच वापरून फेकून दिली जाणारी ताटे, चमचे, डबे यांच्यावरील कारवाईला मुंबईत पुन्हा एकदा वेग येणार आहे. सन २०१८ मध्ये राज्य सरकारने संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली होती. त्यानंतर पालिकेनेही प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली होती. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाईसाठी पथके नेमली होती. मात्र टाळेबंदीच्या काळात दोन वर्षे ही प्लास्टिक बंदीची कारवाई पूर्णपणे थंडावली होती. मात्र करोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर पालिकेने जुलै २०२२ पासून पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केली होती. तरीही त्या कारवाईला फारसा वेग नव्हता. आता मात्र महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने या कारवाईत पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. या कारवाईत पोलीस आणि एमपीसीबीनेदेखील पालिकेच्यासोबत सहभागी होण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने कारवाईसाठीचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे या कारवाईला आता खऱ्या अर्थाने वेग येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मोनोरेल मार्गिका ओलांडून जाणार मेट्रो २ ब मार्गिका, चेंबूरनाका येथील मोनोरेल मार्गिकेवर गर्डरची यशस्वी उभारणी

या कारवाईसाठी प्रत्येक वॉर्डात पाच अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात येणार आहे. यात तीन अधिकारी पालिकेचे, एक एमपीसीबीचे तर एक पोलीस असतील, अशी माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली. एमपीसीबीने २५ अधिकाऱ्यांची नावेही पालिकेला कळवली असून त्यानुसार पथके तयार केली जाणार आहेत. सोमवारी २१ ऑगस्टपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पथकाद्वारे दुकाने, मंडया, फेरीवाले, मॉल यांच्याकडील प्लास्टिकच्या पिशव्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तू, पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे डबे, एकदाच वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू यांच्या साठवणूकदारांवर व विक्रेत्यावरही दंडात्मक कारवाई होणार आहे. तसेच ग्राहकांकडे प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास त्यांनाही समज दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनीदेखील प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा – संजय राऊत मुंबईतून निवडणूक लढवणार? पत्रकारांनी विचारताच म्हणाले, “ईशान्य मुंबईतून…!”

असा आहे दंड

प्रतिबंधित प्‍लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसर्‍या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसर्‍या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे.