मुंबई : मुंब्रा दुर्घटनेच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमावी, अशी मागणी मुंबई रेल्वे प्रवासी संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे. तसेच, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आंदोलक रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

मुंबईची उपनगरीय रेल्वे लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. परंतु, गुरुवारी सायंकाळच्या गर्दीच्या वेळी आंदोलकांनी मोटरमनच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करून रेल्वे सेवा विस्कळीत केली. परिणामी, लाखो प्रवाशांचा प्रवास रखडला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे स्वरुप तीव्र झाले होते. परंतु, अचानक लोकल सेवा सुरू झाल्यानंतर सँडहर्स्ट रोड स्थानकात लोकलच्या धडकेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर तीन प्रवासी जखमी झाले. त्यामुळे या घटनेला जबाबदार असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांच्याकडे केली. तर, मुंब्रा दुर्घटना प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश समिती नेमावी, अशी मागणी मुंबई रेल्वे प्रवासी संघाने मुख्यमंत्र्याकडे केली आहे.