‘गॅलरी मीरचंदानी+ ष्टाइनऱ्यूक’ हे नाव उच्चारायला कठीण, शिवाय हे कलादालन साक्षात् ‘ताजमहाल हॉटेल’च्या मागच्या रस्त्यावरल्या ‘सनी हाउस’ इमारतीत-पहिल्या मजल्यापर्यंत गेल्यावर लाकडीच दाराच्या आड! उषा मीरचंदानी आणि त्यांच्या विवाहित कन्या रंजना ष्टाइनऱ्यूक यांच्या या गॅलरीनं गेल्या दहा वर्षांत नामवंत चित्रकारांच्या जोडीनं अगदी निवडकच तरुण कलावंतांनाही स्थान दिलं. याच गॅलरीच्या दहाव्या वर्धापनदिनाचा भाग म्हणून रणजित होस्कोटे यांनी विचारनियोजित केलेलं ‘ड्वेलिंग’ हे प्रदर्शन इथं भरलं आहे आणि त्याचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. ड्वेलिंग म्हणजे घर किंवा रहिवास. पण कुणाचं ‘घरपण’ कशात असतं? कुणाला कुठे घरपण गवसतं? अशा प्रश्नांची उत्तरं शोधल्यास ‘ चार भिंती आणि छप्पर’ ही कल्पना तोकडीच ठरते. कारण घरपणाची कितीतरी उत्तरं सापडतात आणि त्यात अगदी ‘समुद्र-धरती-आकाशाच्या सान्निध्यात मानवजात’ इथपासून ते स्वतचा देह व त्यातलं आत्मभानयुक्त मन इथपर्यंत केवढंतरी वैविध्य असतं. हा झाला , हे प्रदर्शन बघितल्यामुळे समजणारा ‘ड्वेलिंग’चा एक अर्थ. पण रणजित होस्कोटे यांन आणखी निराळा अर्थ अभिप्रेत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदर्शनाचे विचारनियोजक होस्कोटे यांना अभिप्रेत असलेल्या अर्थाला एक निराळाच संदर्भ आहे. तो आहे मार्टिन हायडेग्गर (१८८९-१९७६) या जर्मन तत्त्वज्ञानं १९५१ साली लिहिलेल्या ‘बिल्डिंग ड्वेलिंग थिंकिंग’ (रहिवासाच्या वैचारिकतेची उभारणी) या  निबंधाचा संदर्भ. ऐन उमेदीच्या काळात नाझी पक्षाकडे आकृष्ट झालेल्या हायडेग्गर यांनी पुढे त्या पक्षातून अंग काढून घेतलं, जर्मनीच्या फाळणीनंतर बिगरकम्युनिस्ट पश्चिम जर्मनीतच ते राहू लागले, पण त्या देशानं त्यांच्या एकेकाळच्या नाझीपणाची शिक्षा म्हणून त्यांना लिखाण प्रकाशित करणं तसंच प्राध्यापकी करणं यांपासून वंचित ठेवलं. बंदीच ती एकप्रकारची. ती सहा वर्षांत उठली, त्यानंतर प्रकाशित झालेला पहिलावहिला निबंध हा ‘बिल्डिंग ड्वेलिंग थिंकिंग’. आपल्या देशात ‘आपल्याला कुठेतरी जागा आहे’ असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे, असा त्या निबंधाचा सूर होता. विविधतेच्या आदरावर आधारलेल्या राजकीय सहिष्णुतेवर त्यात भर होता.  याचा अर्थ होस्कोटे चित्रकारांसह लावताहेत. या प्रदर्शनातल्या काही कलाकृती आधीच्याच आहेत (उदाहरणार्थ, दयानिता सिंग यांनी लालरंगी कापडातल्या सरकारी कागदपत्रांच्या गठ्ठय़ांचे टिपलेले फोटो, हे त्यांच्या ‘फाइल रूम’ या २०१३ मधल्या कामाचा भाग आहेत. किंवा ज्योतिबसू यांनी तर १९९६पासूनचं स्केचबुकच मांडलं आहे ). पण बहुतेक कलाकृती आजवर अप्रदर्शित अशा आहेत.

प्रदर्शनातून सलग अनुभव मिळत नाही. कदाचित हेच होस्कोटे यांना बहुधा हवं आहे; पण ही सर्व चित्रं माणसांची नसली तरीसुद्धा माणसांबद्दलची आहेत. फायलींचे गठ्ठे, समुद्रकिनारा एवढंच दृश्य दिसत असेल, तरीदेखील माणसांच्याच जगण्याबद्दलची चित्रं ! अनेकांच्या चित्रांमध्ये माणसं आहेतच, पण ती का आहेत आणि कशाप्रकारे आहेत, याच्या उत्तरांमध्ये वैविध्य दिसेल. रतीश टी. यांनी केरळी घरातल्या एका दैनंदिन प्रसंगाचं चित्र काढताना मुख्य स्त्रीपात्राला- ‘अम्मा’ला- महत्त्व दिलं आहे. अबुल हसन यांच्या चित्रांना कलेच्या इतिहासाचा, बुद्धदेव मुखर्जी यांच्या चित्रांना कल्पनारम्यतेचा, तर विधा सौम्या यांच्या(बॉलपेनांनीच रंगवलेल्या) चित्राला ‘स्वतलाच हसण्या’चा आधार आहे. सुरभि शर्मा यांची कलाकृती ‘व्हीडिओकला’ प्रकारातली असली, तरी मुळात त्यांनी सहा जणांकडून काही नृत्यमय, गर्भितार्थी हालचाली करून घेतल्या आणि त्याचं चित्रीकरण केलं. त्यामुळे तो ‘पर्फॉर्मन्स आर्ट’च्या जवळ जाणारा प्रकार ठरतो आहे. या सर्वापेक्षा निराळंच काम मनीष नाई यांचं आहे. ते काहीजणांना कदाचित आवडणार नाही. पण मनीष नाई हे खरोखरच वेगळा विचार करू शकणारे अमूर्तकार आहेत. त्यांनी यापूर्वी (२०१४) साली ‘कोची बिएनाले’मध्ये केलेलं एक काम ‘ऑप आर्ट’ प्रकारातलं होतं, तसंच काहीसं हे लोखंडी जाळय़ांमधून हलते/ प्रवाही आकार दाखवणारं काम आहे, असंही मानता येईल. तरीही, त्यांचं हे काम त्यांच्या अन्य कुठल्याही कामापेक्षा निराळं आहे. त्यामुळे ही एखादी नवी सुरुवात असेल आणि आत्ता आपण त्याचं प्राथमिक स्वरूप पाहात असू, अशी समजूत करून घेतली तरी पुरे. या कलाकृतीला प्रदर्शनात मध्यवर्ती स्थान मिळालं असलं, तरी रसिकहृदयात जागा सध्या तरी मिळणं कठीण दिसतं.

जहांगीरमधली अमूर्तता..

‘जहांगीर’मध्ये प्रदर्शनासाठी सात-सात र्वष थांबावं लागतं. गुलजार गवळी यांनी प्रदर्शनासाठी अर्ज केला, गॅलरीच्या समितीनं होकार दिला आणि मधल्या काळात त्यांचं निधन झालं. त्यामुळे, दिवंगत चित्रकार गुलजार गवळी यांच्या चित्रांचं प्रदर्शन त्यांच्या कुटुंबियांनी मांडलं आहे. गवळी यांचे अध्यापक-मित्र प्रभाकर कोलते यांची प्रस्तावना त्यांच्या प्रदर्शनपुस्तिकेला आहे. कोलते हे अमूर्तकार. ‘निसर्गाच्या प्रेमामुळे या चित्रकारावर मर्यादा आल्या (म्हणजे, गवळी यांना पूर्ण अमूर्ताकडे जाता आलं नाही), पण निसर्गाशी हा चित्रकार तादात्म्य पावला’ असं चोख निरीक्षण कोलते यांनी नोंदवलं आहे. चित्रांमधल्या आभाळाचं, पाण्याचं अमूर्तीकरण गवळी करतात; पण या महाभूतांना आत्ताच्या अवकाशानं जे विशिष्ट निसर्गरूप आलं आहे ते कसं आणि का नाकारावं, हा प्रश्न ते रूपवैशिष्टय़ांना झुकतं माप देऊन सोडवतात, असं ही चित्रं सांगत आहेत. ती अर्थातच पाहण्याजोगी आहेत आणि अगदी लगतच्याच प्रदर्शन-दालनात संदेश खुळे यांच्या भौमितिक अमूर्त-चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. कागदावर पेन्सिल-पेनानं काढली जाणारी रेषा इथं या चित्रांमध्ये कॅनव्हासवर, जाडसर आणि त्रिमित रूप घेऊन येते. एकरंगी रेषांनी एकमेकांशी कोन करून धरलेला फेर आणि पुन्हा दुसऱ्या रंगांतल्या रेषांच्या फेरानं धारण केलेलं आणखी एखादं रूप यांतून त्यांच्या चित्रांमध्ये अगणितपणा येतो- म्हणजे चित्रं जरी चौकटबद्ध असली तरी रेषांचे फेर कधीच संपणारे नसतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gallery mirchandani
First published on: 13-04-2017 at 01:41 IST