5 day Ganesh Idol Immersion: मुंबई: आज पाच दिवसांच्या गणेशमुर्तीचे विसर्जन होणार असून सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करण्यास प्रदूषण नियामक मंडळाने परवानगी दिली असल्याचा दावा गणेशोत्सव समितीने केला आहे.

मुंबईत दीड दिवसांच्या गणेश विसर्जना दरम्यान समुद्रात शाडूच्या मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यास पालिकेने मज्जाव केला होता. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी सहा फुटांहून कमी उंची असलेल्या घरगुती व सार्वजनिक मूर्तीना कृत्रिम तलावातच विसर्जन करावे लागल्याने अनेक गणेश मंडळानी तसेच गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने प्रदूषण नियामक मंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर प्रदूषण नियामक मंडळाने परवानगी दिली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबावकर यांनी दिली.

सरसकट सर्वच मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते. त्यामुळे मुंबईतील अनेक जुन्या मंडळाच्या लहान मूर्ती पर्यावरण पूरक असूनही त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे लागणार होते. त्यामुळे या मंडळानी नाराजी व्यक्त केली होती.

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या, गिरगावातील १३२ वर्षाची परंपरा असलेल्या केशवजी नाईक चाळ तसेच शास्त्री हॉल, नवरोजी वकील स्ट्रीट हे मानाचे गणपती या जुन्या मंडळाच्या पर्यावरण पूरक मूर्ती असतात व्ही दरवर्षी समुद्रात विसर्जन करण्याची त्यांची परंपरा आहे. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच कृत्रिम तलावात विसर्जन करावे लागणार होते. त्यामुळे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने प्रदूषण नियामक मंडळाकडे पाठपुरावा केला आणि पर्यावरण पूरक मूर्ती नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जनाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने मुंबईत सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तीना बाणगंगा तलाव आणि गिरगाव चौपाटी येथे विसर्जन करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती ऍड. नरेश दहिबावकर यांनी दिली.

३० हजार पर्यावरणपूरक मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन…

दीड दिवसाच्या तब्बल ६०, १७७ मुर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक ६९१ इतक्या तर घरगुती ५९ हजार ७०६ इतक्या मूर्तींचा आणि हरतालीकेच्या ३७ मूर्तींचाही समावेश आहे. मात्र त्यादिवशी ३०,४९४ पर्यावरण पूरक मूर्तीचेही विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले होते. त्यामुळे पाच दिवसाच्या विसर्जनाच्या दिवशी तरी पर्यावरण पुरक मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक तलावात करता येणार का याकडे भक्तांचे लक्ष लागले आहे.