मुंबई : गणेशोत्सवामुळे सध्या सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात घरगुती गणेशोत्सवातील विविध संकल्पनांवर आधारित देखावे लक्षवेधी ठरत आहेत. घरगुती गणेशोत्सवातील देखाव्यांतून ‘मुंबई दर्शन’ची झलक पाहायला मिळत असून पर्यटनस्थळ दाखविण्यासह विविध विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे अनेकांनी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून देखावे साकारले आहेत.

दरवर्षी परळमध्ये राहणारे पराग सावंत देखाव्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर जनजागृती करीत आहेत. यंदा पराग सावंत यांनी घरगुती गणेशोत्सवासाठी ‘शहाणपण देगा देवा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे. गजबजाट आणि झगमगाट असणाऱ्या मुंबईत रस्त्याच्या कडेला व नाक्यानाक्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे कचऱ्याचा पुनर्वापर करून काही नागरिक स्वतःच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी झगडत असतात. तसेच कचऱ्यातून नवनिर्मिती करण्याच्या उद्देशाने लहान मुले गणरायाचे रूप कशाप्रकारे साकारतात ? आणि लहान मुलांमधील शहाणपण मोठ्यांनाही मिळू दे, हे देखाव्यातून प्रभावी पद्धतीने मांडण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे हा देखावा पर्यावरणपूरक वस्तूंनी अवघ्या एका आठवड्यात साकारला आहे. तसेच पराग सावंत यांनी यंदा बोरिवली (पूर्व) येथे राहणाऱ्या जयंत प्रधान यांच्या घरगुती गणेशोत्सवासाठीही माझी मुंबई, माझी आई – हिचं ममत्व अनुभवा ‘मुंआई’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे. मुंबई प्रत्येक नागरिकाला कसे सामावून घेते आणि स्वप्न पूर्ण करायला मदत करते, हे देखाव्यातून दाखविण्यात आले आहे.

शीव येथे राहणाऱ्या राहुल रोकडे यांच्या घरगुती गणेशोत्सवासाठी केतन दुधवडकर यांनी ‘मुंबई दर्शन” संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे. यामध्ये गेट वे ऑफ इंडिया, तारापोरवाला मत्सालय, कमला नेहरू पार्क, नेहरू तारांगण, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग), सिद्धिविनायक मंदिर, बेस्ट बस, वांद्रे – वरळी सागरी सेतू, एलिफंटा लेणी या मुंबईतील पर्यटन स्थळांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. हा देखावा ११ दिवसांत साकारण्यात आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

डिलाईल रोड येथे राहणाऱ्या करण पाटील यांनी घरगुती गणेशोत्सवासाठी मुंबईतील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक आणि जैवविविधता तसेच वनस्पतीशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासकेंद्र असलेले वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा (राणीची बाग) देखावा साकारलेला आहे. पर्यावरणपूरक वस्तूंनी पर्यावरणाशी निगडित देखावा साकारण्याच्या उद्देशाने कविता पाटील यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यात बागेचे प्रवेशद्वार, वाटा, झाडे, वनस्पती, प्राणी आदी विविध गोष्टी हुबेहूब दाखविण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक वस्तूंनी हा देखावा दोन महिन्यांत साकारला असून आदित्य घोरपडे, अनिकेत सूर्यवंशी, आशुतोष पवार, आकाश चाळके, जय पाटील यांनी सहकार्य केले आहे.

अनेकांना मुंबईतील गणेशोत्सवामधील आगमन व विसर्जन मिरवणुकांचे आकर्षण असते. विसर्जनाच्या दिवशी ‘लालबागचा राजा’ प्रवेशद्वाराबाहेर पडतो आणि जल्लोष होतो, अनेकांचे पाय थिरकायला लागतात, हे गिरगावमध्ये राहणाऱ्या मन रेळे याने देखाव्यातून दाखविले आहे. हा देखावा पर्यावरणपूरक वस्तूंनी साकारला आहे.