मुंबई : गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले असून गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. तसेच, गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या एक खिडकी योजनेअंतर्गत गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून नुकतेच घोषित केले आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाईन पद्धतीने देण्याचे नियोजन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी सोमवारपासून महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबईतील हजारो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सवासाठी सार्वजनिक किंवा खासगी जागेवर मंडप उभारतात. या सर्व मंडळांसाठी महानगरपालिकेने विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अवघ्या काही मिनिटांत गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीचा आणि नूतनीकरणाचा अर्ज भरण्याची सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध केली आहे.

दरम्यान, कोकणामधून मुंबईत मोठ्या संख्येने गणेशमूर्ती विक्रीसाठी आणण्यात येतात. त्यामुळे कोकणात जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्ती घडवाव्यात, यासाठी तेथील मूर्तिकारांना शाडू मातीसह इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कोकण विभागीय आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे.

मंडळांनी संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज भरल्यानंतर त्यांना पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस यांच्याकडे ना-हरकत प्राप्त करण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही. ही सर्व प्रक्रिया महानगरपालिकेच्या विभागस्तरावर सहायक आयुक्त व परिमंडळीय स्तरावरील उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणार आहे. परिणामी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना धावपळ करावी लागणार नाही.

ऑनलाइन अर्ज कसा करणार?

मुंबईतील गणेश मंडळांना सर्व परवानग्या सुलभतेने मिळाव्यात, यासाठी महानगरपालिकेने एक खिडकी योजना राबविली आहे. त्यातून एकाच अर्जावर अनेक परवानग्या मिळण्यास मदत मिळेल. मंडप उभारण्यासाठीचा ऑनलाइन अर्ज महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर एक खिडकी पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संकेतस्थळावर ‘नागरिकांकरिता’ रकान्यामध्ये ‘अर्ज करा’ येथे मंडप परवानगीसाठी अर्ज सादर करता येईल.

खड्डा खणल्यास दुरुस्ती खर्च व दंड भरा

रस्ते व पदपथावर खड्डा विरहित मंडप उभारणीसाठी प्रभावी तंत्र उपलब्ध आहे. या तंत्राचा उपयोग करून गणेश मंडळांनी मंडप उभारावेत, असे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे. मंडप उभारताना खड्डा खणल्याचे आढळल्यास संबंधित मंडळांकडून रस्त्याच्या पुनर्बांधणीचा खर्च व दंड वसूल केला जाणार आहे. प्रति खड्डा याप्रमाणे रक्कम वसूल करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरणपूरक मूर्ती, नैसर्गिक साहित्यावर भर

गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी महानगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सर्व मंडळांनी पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती स्थापना करावी. तसेच, मूर्तीची सजावट व देखावे साकारताना पर्यावरणपूरक व नैसर्गिक साहित्याचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेडून मूर्तिकारांना आतापर्यंत ९०७ टन शाडू माती मोफत देण्यात आली आहे. तसेच, मूर्ती घडविण्यासाठी ९७९ मूर्तिकारांना तात्पुरत्या स्वरुपात मंडपांसाठी निःशुल्क जागाही देण्यात आली आहे.