लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः मालकाला मुलगा झाल्यामुळे मोफत धान्य वाटण्यात येत असल्याचे सांगून बोलबच्चन टोळीने आमदाराच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या अंगावरील दागिने पळवल्याची घटना दादर परिसरात घडली. आरोपींनी महिलेची सोनसाखळी व कर्णफुले हातचालाखीने लंपास केली. याप्रकरणी महिलेने तक्रार करताच दादर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारदार लक्ष्मी पवार प्रभादेवी परिसरात वास्तव्यास आहेत. दादरमधील आमदार सदा सरवणकर यांच्या शिवाजी पार्क येथील घरी त्या स्वयंपाक करण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे सोमवार, १० जुलै रोजी स्वयंपाक केल्यानंतर त्या टॅक्सीने घरी जात होत्या. त्या प्रभादेवी सर्कल येथे उतरून पायी घरी जात असताना त्यांना वाटेत दोन व्यक्ती भेटल्या. त्यातील एकाने त्यांच्या मालकाला मुलगा झाल्यामुळे ते गरीबांना मोफत धान्य वाटप करत असल्याचे सांगितले. ते धान्य मी तुम्हाला आणून देतो, पण मालकापुढे तुम्ही गरीब दिसायला हव्या, असे त्याने सांगितले.
हेही वाचा… महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर झोपु योजना लादण्याचा प्रयत्न; भूखंडावर फक्त सात झोपड्या
त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने त्यांना त्यांच्या गळ्यातील व कानातील दागिने काढून त्यांच्या पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यानंतर ते सुमेर टॉवर जवळ आले असता त्या व्यक्तींनी त्यांना एक पिशवी आणून दिली व त्यात चपला, मोबाइल ठेवण्यास सांगितले. तसेच त्यांच्याकडील पाकिटात दागिने ठेऊन ते पिशवीत ठेवण्यास सांगितले. आरोपींनी त्यानंतर महिलेला एका ठिकाणी बसवून ठेवले. आमचे मालक आले की, त्यांना आशीर्वाद द्या, आम्ही राशन घेऊन येतो, असे सांगितले.
त्यानंतर ते दोघेही विरुद्ध दिशेला निघून गेले. १५ ते २० मिनिटे झाली तरी दोघेही परत आले नाहीत. म्हणून महिलेने त्यांची पिशवी तपासली असता त्यात पाकिट नव्हते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तात्काळ त्यांनी दादर पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार केली. तक्रारीनुसार, त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व कर्णफुले आरोपींनी पळवून नेली आहेत. पोलीस सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने अधिक तपास करीत आहेत.