मुंबई : कांदिवली येथील मिलिटरी मार्गावरील ईइसआयसी रुग्णालयामागच्या राम किसन मेस्त्री चाळीतील एका दुकानात बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून वायुगळती होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत सातजण होरपळले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एक पुरुष व सहा महिलांचा समावेश आहे.
राम किसन मेस्त्री चाळीतील एका दुकानात ही दुर्घटना घडली. दुकानातील एलपीजी सिलिंडरमधून गळती होत होती आणि अचानक आगीचा मोठा भडका उडाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. विद्युत यंत्रणा व विजेच्या तारांमुळे आग पसरली.
या दुर्घटनेत शिवानी गांधी (५१), नीतू गुप्ता (३१), जानकी गुप्ता (३९), मनराम (५५), रेखा जोशी (४७), दुर्गा गुप्ता (३०), पुनम (२८) हे सातजण जखमी झाले. उपचारासाठी शिवानी, नीतू, जानकी, मनराम यांना तातडीने नजीकच्या ईएसआयसी रुग्णालयात, तर उर्वरित जखमींना बीडीबीए रुग्णालयात नेण्यात आले. जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सहाजण ७० ते ९० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.