मुंबई : कोकणातील गणेशोत्सवाचे सर्वांनाच आकर्षण असल्यामुळे गणेशोत्सवात चाकरमान्यांची पावले आपसूकच गावाकडे वळतात. उत्सवाच्या आडून आपुलकीच्या नात्यांचे धागे जपणाऱ्या घरोघरच्या प्रयत्नांची सुरेख गोष्ट ही नवज्योत बांदिवडेकर याने आपल्या चित्रपट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटातून मांडली. या चित्रपटाने तिकीट खिडकीवर यशस्वी कामगिरी करीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव शुक्रवार, २९ ऑगस्टपासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे.

‘घरत गणपती’ चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनाबाबत आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर म्हणाले की, ‘घरत गणपती’ चित्रपट मोठ्या पडद्यावर पहायला कधी मिळणार? यासंदर्भात प्रेक्षकांकडून वारंवार विचारणा होत होती. त्यामुळे लोकाग्रहास्तव ‘घरत गणपती’ चित्रपटाचे पुनःप्रदर्शन करताना आनंद होत आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पहाण्याची एक वेगळी मजा आहे. आम्ही एक छान कौटुंबिक कथा व भारतीय संस्कृतीचे दर्शन ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या माध्यमातून घडविले. या चित्रपटाचे विविध स्तरातून कौतुक होत असल्याचा अभिमान आहे’.

गणेशोत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचे आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट ‘घरत गणपती’ चित्रपटातून पुन्हा अनुभवता येणार आहे. प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव, अभिनेत्री अश्विनी भावे, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री निकिता दत्ता, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, समीर खांडेकर, राजसी भावे यांच्यासह प्रसिद्ध कलाकारांच्या दर्जेदार अभिनयाने हा चित्रपट सजलेला आहे. तसेच ‘घरत गणपती’ चित्रपटातील ‘माझ्या कोकणचो रुबाब भारी’, ‘नवसाची गौराई माझी’, ‘गणपती आले’ या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात अक्षरशः घर केले आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या विद्यमाने आलेल्या ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे आहे. तर कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर एकूणच चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत सगळ्याच गोष्टी लक्षवेधी ठरल्या होत्या. आता हीच मजा येत्या २९ ऑगस्टपासून पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.

‘चित्रपटाच्या संपूर्ण चमूने अतिशय मेहनत घेऊन हा चित्रपट निर्माण केला आणि त्याला प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम प्रेक्षकांचे आभार मानतो’, असे पॅनोरमा स्टुडिओजचे सीईओ (डिस्ट्रीब्युशन आणि सिंडिकेशन) मुरलीधर छतवानी यांनी सांगितले.