मुंबई : घाटकोपर पूर्व मतदारसंघात भाजपच्या दोन नेत्यांमध्ये अखेर मनोमिलन झाले. भाजपचे उमेदवार पराग शाह आणि माजी आमदार प्रकाश मेहता यांच्यातील वाद मिटवून अखेर दिलजमाई करण्यात भाजपच्या पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. या मतदारसंघासाठी प्रचंड आग्रही असलेल्या प्रकाश मेहता यांनी अखेर रविवारपासून पराग शाह यांच्या प्रचाराला सुरूवात केली. पराग शाह यांच्यासोबत ते रविवारी प्रचारासाठी घाटकोपरमध्ये फिरत होते.

घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रकाश मेहता यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने यावेळीही मेहता यांच्याऐवजी शाह यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मेहता नाराज झाले होते. मेहता यांनी खूप आधीपासून निवडणुकीची तयारी केली होती. तसेच भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर दबावही आणला होता. तसेच ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा होती. मेहता यांना डावलून २०१९ मध्ये पराग शाह यांना उमेदवारी जाहीर झाली होती. तेव्हाही प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये विरोध दर्शवला होता. यावेळीही मेहता यांनी गेल्या सहा महिन्यांपासून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. यंदाही त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते प्रचारात सामील झाले नव्हते. मात्र अखेर भाजपच्या पक्षश्रेष्ठींना या दोघांमधील वाद मिटवण्यात यश आले. यशस्वी शिष्टाईनंतर मेहता यांनी रविवारपासून प्रचाराला सुरूवात केली.

हेही वाचा – मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक

हेही वाचा – देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेहता हे रविवारी घाटकोपरमधील विविध गृहनिर्माण संकुलांमधील बैठकांना शाह यांच्यासह हजर होते. शाह यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे सध्या ते व्हील चेअरवरून प्रचार करीत आहेत. शाह आणि मेहता यांच्यातील वितुष्ट आणि त्यात पायाचे दुखणे यामुळे शाह यांच्यासाठी ही निवडणूक काहीशी कठीण बनली होती. या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीच्या (शरद पवार) राखी जाधव या निवडणूक लढवित आहेत. भाजपच्या दोन नेत्यांमधील वादाचा जाधव यांना लाभ होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र मेहता यांच्याशी दिलजमाई झाल्यामुळे त्यांचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. मेहता यांनी रविवारी डेरावसी जैन संघ, रिंगवाला जैन संघ, निळकंठ व्हॅली, निळकंठ रिजंट येथील गृहनिर्माण संकुलांमध्ये रहिवाशांच्या बैठका घेतल्या व शाह यांचा प्रचार केला.