मुंबई : गांजाची तस्करी करणाऱ्या एका महिलेला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. या महिलेच्या ताब्यातून पोलिसांनी दहा हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी पोलीस अधिक अधिक तपास करीत आहेत. घाटकोपर पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी गुरुवारी रात्री असल्फा परिसरात गस्त घालत होते. यावेळी येथील कलावती चाळ परिसरात एक महिला पोलिसांना संशयास्पद फिरताना आढळली. पोलिसांची गाडी जवळ येताच तिने तत्काळ तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिला थांबवून विचारपूस केली असता तिने पोलिसांना उत्तरे दिली.
पोलिसांचा संशय बलावल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिची झडती घेतली असता तिच्याजवळील पिशवीत गांजा सापडला. या गांजाची किमत दहा हजार रुपये आहे. अनुराधा म्हात्रे (५५) असे या महिलेचे नाव असून ती घाटकोपरच्या असल्फा परिसरातील रहिवासी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती गांजाची तस्करी करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.