मुंबईः विद्यमान २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत सोन्याच्या किमती ३३ टक्क्यांनी वाढल्या असून, बुधवारी नजीकच्या काळातील भावातील तेजीचा भविष्यवेध घेणाऱ्या एका संशोधन अहवालाने आणखी उच्चांकी भरारीचे अंदाज वर्तविले आहेत. डॉलरच्या तुलनेत घसरते रुपयाचे विनिमय मूल्य आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणात नरमाईच्या अपेक्षांनी सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमती कडाडण्याची शक्यता आहे.
भारतात सोन्याचा भावातील तेजी यापुढेही सुरूच राहणार असून, चालू वर्षाच्या उरलेल्या काळात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ९९ हजार ५०० रुपये ते १ लाख १० हजार रुपयांदरम्यान खाली-वर होत राहील. मात्र पुढील वर्षीच्या पहिल्या सहामाहीत हा भाव एक लाख २५ हजार रुपयांचा उच्चांकी स्तर दाखवेल, असा अंदाज आयसीआयसीआय बँकेच्या आर्थिक संशोधन गटाच्या ताज्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.
सोन्याच्या किमतींसाठी अंदाज काय?
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन सुरू राहिल्यास सोन्याच्या भावात आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा आयसीआयसीआय़ बँकेच्या अहवालात देण्यात आला आहे. या अहवालानुसार, सोन्याच्या भावात चालू वर्षात ३३ टक्के वाढ झाली आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून पतधोरणात शिथिलता येण्याची शक्यता आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत व्यक्त होणारी चिंता यामुळे सोन्याच्या भावात तेजी राहणार आहे. सोन्याच्या किमती आणि जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्थेचे चलन अर्थात डॉलर यांच्यातील व्यस्त नाते, या भाव तेजीस कारक ठरणार आहे.
जागतिक पातळीवर सोन्याचा भाव या वर्षीच्या उरलेल्या काळात प्रति औंस ३,४०० ते ३,६०० डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. तर पुढील वर्षी पहिल्या सहामाहीत तो ३,६०० ते ३,८०० डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. औंस हे सोन्याच्या वजनाचे आंतरराष्ट्रीय एकक असून, एक औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम इतके वजन भरते.
भू-राजकीय तणाव कायम राहिल्यास सोन्याच्या सव्वा लाखांच्या भाव पातळीत आणखी वाढ नोंदविली जाऊ शकते. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे मध्यम काळासाठी सोन्याच्या भावातील तेजी कायम राहील. सध्या व्यापार युद्धाची अनिश्चितता काही प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे सोन्याची खरेदी काही प्रमाणात मंदावली आहे. सोन्याच्या भावातील पुढील तेजी ही अमेरिकेतील स्थितीवर अवलंबून असेल. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीची अपेक्षा असून, त्यानंतर गुंतवणूकदार डॉलरबाबत सावध पवित्रा घेतील, असे अहवालात म्हटले आहे.
रुपयाच्या कामगिरीकडे लक्ष
या अहवालात डॉलरच्या तुलनेत रुपयाची पातळी ८७ ते ८९ अशी गृहित धरण्यात आली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची पातळी त्यापेक्षा खाली घसरल्यास सोन्याचा भाव आणखी वाढणार आहे, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत रुपयाने प्रति डॉलर ८८ च्या पातळीवर लोळण घेतल्याने, देशांतर्गत सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.