विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये वादंग आणि रस्सीखेच सुरू असून माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे गटाचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रदेशच्या सुकाणू समितीने विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि पांडुरंग फुंडकर यांच्या नावाची शिफारस केली असली तरी गडकरी यांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे पक्षाने अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा केलेली नाही. पण तावडे हे निवडून येण्यासाठी अतिरिक्त मते आणतील, अशी खात्री देण्यात येत असल्याने त्यांना उमेदवारी देण्याबाबत पक्ष अनुकूल असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर फुंडकर यांच्याऐवजी नवीन नेत्याला संधी देण्यासाठी पक्षातील गडकरी गटाचे नेते प्रयत्नशील आहेत.
तावडे हे गडकरी गटाचे असून फुंडकर हे मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. दोघांनाही याआधी दोन वेळा पक्षाने उमेदवारी दिली आहे. कोणालाही तिसऱ्यांदा उमेदवारी न देण्याची पक्षाची प्रथा आहे. त्यानुसार नवीन उमेदवार देऊन अन्य नेत्यांना संधी द्यावी, असा पक्षात मतप्रवाह आहे. पण दुसऱ्या उमेदवाराला जिंकून येण्यासाठी  ११ अतिरिक्त मतांची आवश्यकता असून ती तावडे आणू शकतील, अशी खात्री पक्षनेतृत्वाला देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा अपवाद करण्याची  शिफारस करण्यात आली. फुंडकर यांच्या मुलाला विधानसभेसाठी रस आहे. पण त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी न देता त्यांचा विधानसभेसाठी विचार करावा, अशी मागणी काही नेत्यांनी पक्षनेतृत्वाला केली आहे. त्यामुळे अरूण अडसड, सुनील राणे, नीता केळकर या काही नावांवर विचारविनिमय सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत निवडणूक समितीची शनिवारी सकाळी बैठक झाली. त्यावेळी गडकरी यांनी तावडे व फुंडकर दोघांनाही दोनदा उमेदवारी दिल्याने पुन्हा ती देण्यास विरोध केला. पण त्यानंतर झालेल्या चर्चेत अतिरिक्त मतांसाठी तावडे यांच्याबाबत अपवाद करण्याचा विचार झाला. विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवापर्यंत मुदत आहे. त्यामुळे अधिकृतपणे उमेदवारांची नावे रविवारी किंवा सोमवारी सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे.
पूनम महाजनांना उमेदवारी?
मुंडे गटाला अडचणीत आणण्यासाठी पूनम महाजन यांचे नाव विधान परिषदेच्या दुसऱ्या जागेसाठी ऐनवेळी पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. यामुळे मनसेची ११ मते किंवा अन्य पक्षांची मते मिळवण्यासाठी मुंडे यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. आता मुंडे गट कोणती खेळी खेळतो यावर उमेदवारांची नावे निश्चित होतील.