मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा -दहिसर-भाईंदर हा प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पासाठी गोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल अडथळा ठरतो आहे. अवघ्या सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल पाडावा लागणार आहे. महापालिका प्रशासन त्यावर विचार विनिमय करीत असून तसे झाल्यास त्याला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.
शिवडी वरळी उन्नत मार्गासाठी प्रभादेवीचा (एलफिन्स्टनचा) पूल पाडण्याच्या वाद अद्याप मिटलेला नसताना आता आणखी एका विकासकामासाठी जुना पूल पाडावा लागणार आहे. मुंबई महापालिकेने सागरी किनारा मार्गाचा उत्तर मुंबईत जो भाग आहे त्याचे काम सुरू केले आहे. वर्सोवा ते दहिसर आणि पुढे भाईंदरपर्यंत हा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या आवश्यक त्या जमिनीचे संपादन वेगाने करावे, तसेच शासकीय जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी, असे निर्देश नुकतेच पालिका प्रशासनाने दिले आहेत.
तसेच किनारपट्टी नियमन क्षेत्राबाहेरील (NON CRZ) भागामध्ये प्रत्यक्षात कामेही सुरू झाली आहेत. मात्र आता या सागरी किनारा मार्गामध्ये गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपुल अडथळा ठरू लागल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे हा पूल तोडावा लागणार आहे. तसेच नियोजन मुंबई महापालिकेने केले असल्याचे समजते. तब्बल २७ कोटी रुपये खर्चून हा उड्डाणपूल सात वर्षापूर्वीच मुंबई महापालिकेने बांधला होता.
२०१८ मध्ये उद्घाटन
गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूलाला एमटीएनएल उड्डाणपुल नावानेही ओळखले जाते. हा उड्डाणपूल रेडिसन हॉटेलपासून रुस्तमजी ओझोन परिसरापर्यंत आहे. या पुलाचे उद्घाटन २०१८ मध्ये करण्यात आले होते. हा पूल पाडून सागरी किनारा मार्ग प्रकल्पांतर्गंत येथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दुमजली पूलाचा वरील मार्ग मालाड माईंडस्पेसपासून दिंडोशी कोर्टापर्यंत पोहोचेल आणि त्याखालील मार्गिका वीर सावरकर उड्डाणपुलाची जागा घेईल.
पर्यायांची चाचपणी
उड्डाणपूल पाडावा लागू नये यासाठी काही पर्यायांची चाचपणीही करण्यात आली. मात्र उड्डाणपूल पाडल्याशिवाय सागरी किनारा मार्गाचे काम पुढे सरकणे अशक्य आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील सूत्रांनी दिली. या पाडकामाचा अंतिम प्रस्ताव लवकरच मुंबई महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मालाड, मढ आणि मार्वेकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम
वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्ग हा पुढे गोरेगाव मुलुंड जोडरस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे सागरी किनारा मार्गावरून पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र त्यासाठी गोरेगावचा पूल पाडावा लागणार आहे. हा पूल पाडला तर सागरी किनारा मार्ग होईपर्यंत येथील होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा पर्याय काय असा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक दिपक ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. हा पूल पाडल्यास मालाड, मढ आणि मार्वेकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गोरेगावचा उड्डाणपूल पाडावा असे प्रस्तावित आहे मात्र त्याची अद्याप औपचारिक मान्यता मिळालेली नाही.