मुंबई : आपल्या ७० वर्षांच्या आजारी आजीला आरे परिसरातील रस्त्याच्या कडेला सोडून जाणाऱ्या नातवासह तिघांविरोधात आरे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आजी स्वत: घर सोडून गेल्याचा दावा नातवाने केला होता. पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केल्यानंतर नातवानेच शनिवारी पहाटे आजीला रिक्षातून आरेच्या जंगलात सोडल्याचे उघड झाले.
आरे परिसरातील दर्गा रस्त्यावरील निर्जन भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवार, २१ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास यशोदा गायकवाड (७०) जखमी अवस्थेत आढळल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच आरे पोलिसांनी गायकवाड यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. माझ्या नातवाने मला इथे आणून सोडले, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांना आपल्या घरचा पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या छायाचित्राच्या आधारे घर शोधून काढले.
यशोदा गायकवाड यांचा नातू सागर शेवाळे (३३) कांदिवलीच्या हनुमान नगर येथे रहात असल्याचे पोलिसांना समजले. परंतु माझी आजी खोट बोलत असल्याचा कांगावा सागरने केला. माझी आजी याच परिसरात एकटी रहात होती. मागील काही महिन्यांपासून आम्ही तिचा सांभाळ करण्यासाठी घरी आणले होते, असे तो म्हणाला. माझी पत्नी आणि मी शनिवारी सकाळी कामाला गेलो होतो, तर मुले शाळेत गेली होती. त्यावेळी आजी स्वत:हून घर सोडून गेली असावी, असे शेवाळेने पोलिसांना सांगितले. मी आजीला रस्त्यात सोडून पळ काढला अशा आशयाच्या बातम्या खोट्या असल्याचे त्याने सांगितले होते. आपली बाजू मांडण्यासाठी त्याने एक चित्रफितही तयार केली होती.
नातवासह तिघांविरोधात गुन्हा
आरे पोलिसांचा सागर शेवाळेच्या दाव्यावर विश्वास नव्हता. कांदिवली – गोरेगाव दरम्यान खूप अंतर आहे. त्यामुळे आजाराने जर्जर झालेल्या यशोदा गायकवाड एकट्या तिथे जाणे शक्य नाही, असे पोलिसांचे मत होते. त्यामुळे पोलिसांनी सागर शेवाळेने केलेल्या दाव्याची पडताळणी केली. यशोदा गायकवाड आपल्या नातवासह हनूमान नगर झोपडपट्टी परिसरात रहात होती. तेथे सीसी टीव्ही कॅमेरे नव्हते. पोलीस पथकाने या परिसरातील अन्य ठिकाणच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले. गेल्या शनिवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारस तीन जण गायकवाड यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात नेत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात आढळले.
अधिक चौकशी केली असता सागर शेवाळेने आपल्या कृत्याची कबुली दिली. आजीची तब्येत खालावल्याने तिला आम्ही शताब्दी रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयाने तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तिला आरेच्या जंगल परिसरातील रस्त्याच्या कडेला सोडल्याचे त्याने सांगितले. मेव्हणा बाळासाहेब पवार आणि रिक्षाचालक संजय कुशदीम उर्फ बॉबी यांच्या मदतीने त्याने आजीला आरेच्या निर्जन रस्त्यावर नेले. यासाठी रिक्षाचालकाला ४०० रुपये दिले, असे पोलिसांनी सांगितले.
या तिघांविरोधात ज्येष्ठ नागरिकाला वाऱ्यावर सोडणे किंवा त्याचा पूर्णपणे त्याग केल्याप्रकरणी पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम कायद्यातील कलम २४ अन्वये, तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघावर नोटीस बजावण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, असे आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले.