मुंबई : ‘सैय्यारा’ या हिंदी चित्रपटासाठी एका आठवड्यानंतर ‘येरे येरे पैसा ३’ हा मराठी चित्रपट बहुपडदा चित्रपटगृहातून (मल्टिप्लेक्स) संपूर्णपणे काढून टाकण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष व निर्माते अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र ‘येरे येरे पैसा’ में इंटरेस्ट नहीं, पब्लिक को मंगता है इमोशनल लव्ह स्टोरी…तुम्हारे स्टोरी में ताकद है तो पब्लिक डिमांड करेंगी, नही है तो फिर कौन डिमांड करेगा’, असे म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी अमेय खोपकरांना डिवचलं.
‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’च्या यशानंतर संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ हा मराठी चित्रपट १८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याच दिवशी ‘सैय्यारा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र ‘सैय्यारा’ चित्रपटासाठी एका आठवड्यानंतर ‘येरे येरे पैसा ३’ हा मराठी चित्रपट बहुपडदा चित्रपटगृहातून (मल्टिप्लेक्स) संपूर्णपणे काढून टाकण्यात आल्याचा दावा निर्माते अमेय खोपकर यांनी केला आहे.
तसेच माझ्या चित्रपटासाठी मलाच आंदोलन करणे पटत नाही. मात्र मराठीची गळचेपी करून मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये लावले नाहीत, तर मी नक्की बदला घेणार, थेट काचाच फुटतील, असा इशारा अमेय खोपकर यांनी मल्टीप्लेक्स मालकांना दिला आहे. आता याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंनी अमेय खोपकरांना डिवचल्याचे समोर आले आहे. तुम्हारे स्टोरी में ताकद है तो पब्लिक डिमांड करेंगी, नही है तो फिर कौन डिमांड करेगा, असे सदावर्तेंनी म्हणत खोपकरांना डिवचले आहे.
दरम्यान, अमेय खोपकर यांच्या चित्रपटात ताकद नसेल आणि चित्रपटगृहात कोणी बसत नसेल, लोक तिकीट घेत नसतील तर मग अर्थ काय?, अशी टीकाही गुणरत्न सदावर्ते यांनी अमेय खोपकर यांच्यावर टीका केली.
यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही – अमेय खोपकर
मी आजवर ज्यांच्यासाठी उभा राहिलो आणि अंगावर केसेस घेतल्या, त्या मनोरंजनसृष्टीतील एकही माणूस पुढे येऊन बोलत नाही. या गोष्टीचे प्रचंड वाईट वाटते, अशी खंतही अमेय खोपकर यांनी व्यक्त केली. तसेच तुम्हाला अमेय खोपकरवर राग आहे, तर अमेय खोपकरचा चित्रपट लावू नका. पण बाकीचे मराठी चित्रपट तरी मल्टिप्लेक्समध्ये दाखवा. महाराष्ट्रातील चित्रपटगृहात मराठी चित्रपट लावण्याची मागणी सरकारकडे करावी लागते, यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. आम्ही सरकार दरबारी जाणार नाही, सरकारने मराठी चित्रपट व निर्मात्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे स्पष्ट मत अमेय खोपकर यांनी व्यक्त केले.