वकील गुणरत्न सदावर्ते यांनी रविवारी (८ मे) एसटी महामंडळाच्या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांना तुम्ही स्वतः निवडणूक लढणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सदावर्ते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आम्ही आसक्तीवाली लोकं नाहीत. कष्टकरी उभे राहतील, आम्ही फक्त त्यांचा आवाज आहोत. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू.” एकूणच सदावर्ते स्वतः निवडणूक रिंगणात न उतरता एसटी कामगारांचा पॅनल एसटी बँक निवडणुकीत उतरवणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या पॅनलला मतदार कसा प्रतिसाद देतात आणि त्यांना किती यश मिळत हे पाहावं लागणार आहे.

“बँक कोणाच्या बापाच्या घरची नाही, त्यामुळे…”

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “बँक ही सहकार क्षेत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक व्यक्ती, एक पद याप्रमाणे बँक, मत आणि उमेदवारीची प्रक्रिया निश्चित केलीय. बँक कोणाच्या बापाच्या घरची नाही. बँकेत कोणाला भ्रष्टाचार करण्यास मोकळीक दिलेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळातील कष्टकरी स्वतः स्वतःची माणसं निवडतील. आतापर्यंत राजकीय बॉसकडून शेतातील बुजगावण्याप्रमाणे लोकं उभी केली जात होती.

“कष्टकऱ्यांना १४-१५ टक्के व्याजाने पैसे देऊन शोषण”

“राजकीय पुढाऱ्यांचे बुजगावणे कष्टकऱ्यांना १४-१५ टक्के व्याजाने पैसे देऊन शोषण करतात. हेच बुजगावणे इतर राज्यांना ७-८ टक्के व्याजाने पैसे द्यायचे. आमची बँक, आमचा पैसा, आमचे कष्ट, आमचे श्रम आणि पैसा मर्जीतील लोकांना दिला जायचा. इतर राज्यांना ७ टक्क्याने पैसे दिले जातात तर इकडे ७ टक्क्याने पैसे का दिले जात नाहीत, हे आमचं म्हणणं आहे,” असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.

हेही वाचा : गुणरत्न सदावर्तेंची १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका, बाहेर पडताच म्हणाले, “हम है…”

“कष्टकरी विना दारू, विना मटण, विना पैसे वाटता एकत्र”

“आज कष्टकरी एकवटला आहे. कष्टकरी विना दारू, विना मटण, विना पैसे वाटता आज बहुसंख्येने एकत्र आला आहे. त्यामुळे विरोधकांना निवडणूक पुढे ढकलावी वाटते. ते म्हणतात डिफॉल्टर असाल तर मतदान करता येणार नाही. आम्हाला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही कोणालाही मतदानापासून वंचित ठेऊ शकत नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात मतदानापासून कोणालाही थांबवता येणार नाही. म्हणजेच यांचेच पायताण यांच्या पायात नाही,” असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunratna sadavarte answer will he contest msrtc bank election or not pbs
First published on: 08-05-2022 at 16:32 IST