संदीप आचार्य

राज्यात हृदयविकाराच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने हृदरुग्णांवर उपचार करण्यासाठी २७ ठिकाणी कॅथलॅब सुरु करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. यातील आठ कॅथलॅब या थेट आरोग्य विभागाच्या तर उर्वरित १९ कॅथलॅब या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार आहेत.

उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांसह वृद्धापकाळ व जीवनशैलीच्या बदलांमुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अलीकडच्या दोन दशकात मोठ्या प्रमाणात तरुणांनाही हृदयविकाराचा झटका येत असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून याची दखल घेऊन आरोग्य विभागाने आठ ठिकाणी कॅथलॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या रुग्णालयात माफक दरात हृदरुग्णांवर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी करण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
या आठ कॅथलॅबपैकी नाशिक येथे पहिली कॅथलॅब सुरु करण्यात आली असून उर्वरित ठाणे, सिंधुदुर्ग, अमरावती, पुणे, जालना, गडचिरोली व नांदेड येथे सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी प्रति कॅथलॅब बांधकामासह सुमारे आठ लाख रुपये खर्च अपेक्षित असून याशिवाय राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या माध्यमातून अन्य १९ कॅथलॅब उभारण्यात येणार आहेत. कॅथलॅब सुरु करण्यासाठी आवश्यक ते कर्मचारी व तंत्रज्ञांच्या जागा भरण्यात येतील तसेच हृदयविकारतज्ज्ञांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले..

खाजगी रुग्णालयात अँजिओप्लास्टीसाठी तीन ते पाच लाख रुपये खर्च येतो व तो सामान्यांना परवडणारा नसतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अँजिओप्लास्टिसाठी सुमारे ६५ हजार रुपये आकारण्यात येत असून पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले जातात. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या रुग्णालयात या आजारासाठी उपचार घेणाऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च योजनेतून केला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुशमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे संलग्नीकरण करून एकत्रितपणे या योजना राबविण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आला. सदर योजना राबिवण्यासाठी युनाटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी व राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून या करारातील तरतुदीनुसार अपेक्षित दाव्यांपेक्षा कमी दाव्यांच्या प्रदानामुळे विमा हप्त्यांपैकी १९३ कोटी ५५ लाख व योजनेचा प्रचार व प्रसार न केल्यामुळे ७९ कोटी १६ लाख असे २३१ कोटी रुपये सोसायटीला उपलब्ध झाले आहेत. या रकमेमधून सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून १९ ठिकाणी कॅथलॅब बसविण्यात येणार आहे तर ३० ठिकाणी मूत्रपिंड विकार रुग्णांसाठी डायलिसीस मशिन घेण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे ठाणे, पुणे आदी ठिकाणी दोन कॅथलॅब सुरु करता येतील. याशिवाय रत्नागिरी,जालना, अमहदनगर, धुळे, बीड, हिंगोली, बुलढाणा, परभणी, गडचिरोली, भंडारा, कराड, सातारा, मुंबई उपुनगर, औरंगाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, नांदेड व वर्धा येथे कॅथलॅब सुरु करण्याची योजना आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यात २७ ठिकाणी हृदरुग्णांवरील उपचारासाठी कॅथलॅब सुरु झाल्यानंतर त्याचा फायदा हजारो रुग्णांना होईल.