मुंबई: राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयांना मिळणारा निधी १२ टक्क्यांवरून आता ५० टक्के इतका होणार आहे. तामिळनाडू पॅटर्नच्या धर्तीवर राज्य सरकारने रुग्णांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला असून येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिले.
अमरावती येथील कॅथ लॅबसंदर्भात संजय खोडके यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारला होता. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी त्यावर उत्तर देताना महात्मा फुले योजनेअंतर्गत निधी वाटपात सरकारी रुग्णालयांना खूपच कमी निधी मिळतो. त्यामुळे ५० टक्क्यांपर्यंत निधी वाढवून देण्याचे विचाराधीन असल्याचे ते म्हणाले. आमदार चित्रा वाघ यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात रुग्णांकडून ६० हजार ते १ लाख २० हजारपर्यंत पैसे घेतले जातात.
या रकमेच्या स्वरूपात “चॅरिटेबल ट्रस्ट” स्थापन केले असून, सायन रुग्णालयात ‘इमारत विकास निधी’ म्हणून ६५ हजार घेतले जातात, तर केईएम रुग्णालयात ‘पुअर बॉक्स फंड’मध्ये पैसे घेतले जातात, असा आरोप करताना अहिल्यानगर येथून आलेल्या एका रुग्णाकडून ऑपरेशनसाठी १ लाख २० हजार रुपये मागितल्याचे सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली जाईल, अशी ग्वाही आबिटकर यांनी दिली.
अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी निधी द्यावा, अशी मागणी संजय खोडके यांनी केली. आरोग्यमंत्र्यांनी त्यावर पूरक मागण्याद्वारे मिळणाऱ्या निधीतून अमरावतीच्या रुग्णालयाला निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच अमरावती येथील कॅथ लॅब पुढील १५ दिवसांत सुरू केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.